करटुले ही एक दुर्मिळ रानभाजी आहे. मुख्यत्वे ही रानभाजी रानावनात आढळते त्यामुळे या भाजीत अनेक पौष्टिक घटक असतात. कटुरले वेलवर्गीय पीक आहे. या भाजीचा कालावधी हा जुलै ते सप्टेंबर या महिन्यांचा असतो. दरम्यान कटुरल्यांचे बियाणे आणि कंद उपलब्ध झाल्यामुळे आता शेतकरी या पिकाची लागवड करू शकणार आहेत. करटुल्यांची लागवड हलक्या ते मध्यम जमिनीवर करणे शक्य आहे यासाठी डोंगरउताराची किंवा पाण्याचा निचरा होणारी जमीन उत्तम मानली जाते. पिकासाठी उष्ण व दमट हवामान आवश्यक असते.
करटुल्यांची लागवड साधारणत: ही मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला केली जाते. कटुरल्यांची लागवड कंद आणि बियाण्यांच्या साहाय्याने करता येते. कटुरले बियाण्यांच्या साहाय्याने लागवड केल्यास पहिल्या वर्षी पिकाची काळजी अधिक घ्यावी लागते. एकदाच करटुल्याची लागवड केल्या नंतर त्याची परत लागवड करावी लागत नाही. यात पिकाची कंदांचे विभाजन होऊन अनेक कंद निर्माण होतात. थेट कंदाच्या साहाय्याने लागवड केल्यास अधिक उत्पन्न मिळवता येते.
अशी करावी लागवड -
या पिकासाठी जमिनीत 1.5 ते 2 मीटर अंतरावर 60 सें.मी. रुंदीचे पाट तयार करावे. या पाटांच्या दोन्ही बाजूस 1 मीटर अंतरावर 30x30x30 सें.मी. आकाराचे खड्डे करावेत. त्या प्रत्येक खड्ड्यात 1.5 ते 2 किलो कुजलेले शेणखत टाकून मातीत मिसळून घ्यावे. त्याचबरोबर 10 ग्रॅम युरिया, 60 ग्रॅम सुपर फॉस्फेट, 10 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मातीबरोबर चांगले मिसळून घेऊन प्रत्येक खड्ड्यात एका कंदाची लागवड करावी. तसेच कंदाचे कुजण्याची प्रमाण कमी करण्यासाठी कंद कॉपर ऑक्सीक्लोराईडच्या २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळलेल्या द्रावणात बुडवून घ्यावे लागतात.
खताचे व्यवस्थापन - प्रतिहेक्टरी उत्पादन घ्यायचे असल्यास 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 100 किलो स्फुरद व 60 किलो पालाश या पिकाला द्यावे लागते. नत्र हे पिकाला वेळोवेळी द्यावे लागते जसे की लागवडीवेळी 50 किलो, लागवडीनंतर 30 दिवसांनी 50 किलो, आणि 60 दिवसांनी 50 किलो. शिवाय हे पिक एक महिन्याचं झाल्यावर प्रत्येक वेलास 10- 15 ग्रॅम युरिया देणे आवश्यक असते.
आंतरमशागत - लागवडीनंतर हे वेल वेगाने वाढू लागतात. अशा वेळी वेलींच्या आळ्यांमध्ये मातीची भर टाकुन वेलींना आधार द्यावा. तसेच वेलाच्या आजूबाजूला उगवलेले गवत खुरपणी करून काढून टाकावे. बांबूच्या काठ्यांचा उपयोग करुन वेलींना आधार द्यावा.
कटुरल्याचे प्रकार -
अंडाकृती आकाराचे कटुरले – या प्रकारात फळांचा रंग हिरवा असतो, आणि फळांवर मऊ काटे असतात. आकार अंडाकृती असतो. एका फळाचे वजन साधारणत: 10 ते 12 ग्रॅम इतके असते.
मध्यम गोल आकाराची कटुरले – या प्रकारात फळांचा रंग हिरवा, मध्यभागी फुगीर असून फळांवरील काटे टणक असतात. एका फळाचे सरासरी वजन 13 ते 15 ग्रॅम असते.
मोठ्या आकाराची गोल कटुरले – या पद्धतीची कटुरले फिकट हिरवे असतात. यात बिया कमी प्रमाण कमी असते. हे सर्व प्रकार एकाच प्रजातीचे आहेत यात फक्त आकार भिन्नता असतो. यात आकाराने लहान असलेल्या कटुल्यांची मागणी जास्त आहे.
कटुरल्याची वैशिष्ट्ये -
कटुल्याचे फळे चवीला रूचकर असतात. या भाजीमळे पोट साफ होते आणि पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी हे फार उपयुक्त आहे. यात कटुरले हे औषधी गुणधर्म युक्त भाजी आहे. तसेच अ आणि क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. या भाजीच्या गुणधर्मांमुळे कटुरले हे डोकेदुखी, केसगळती, खोकला, पोटदुखी, मूळव्याध, काविळ, डायबिटीज, कॅन्सर आणि उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर आजारावर गुणकारी आहे.
Share your comments