परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणी च्या वतीने दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते तर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. प्रवीण वैद्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले की, एक इंच माती तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात, परंतु त्याच मातीची धुप फार अल्पावधीत होते. आज रस्ते बांधकाम व शहरीकरणामुळे मोठया प्रमाणात उपजाऊ जमिनीचा ऱ्हास होत असुन मृदा, जल व पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. मानवाचे आरोग्य हे मातीच्या आरोग्यावर अवलंबुन असुन मानवाच्या चांगल्या भवितव्याकरिता मातीची धुप थांबवली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आपल्या भाषणात म्हणाले की, शेतीत शिफारसी पेक्षा जास्त रासायनिक खतांचा वापर होत असुन सेंद्रिय खतांचा वापर कमी होत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असुन जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी प्रयत्न करावा लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सय्यद इस्माईल यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. स्वाती झाडे यांनी केले तर आभार डॉ. प्रविण वैद्य यांनी मानले. कार्यक्रमास मृद विज्ञान व रसायनशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक मृदा दिनानिमित्त पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता प्रश्नमंजूषा आणि भित्तीपत्रक सादरिकरण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथमस्थान मेघराज नाटेकर व दिग्विजय दामा यांनी संयुक्त पटकावले तर भाग्यलक्ष्मी व अंशुमाला हिने व्दितीय व तृतीय स्थान पटकावले तसेच भित्तीपत्रिका सादरिकरणात प्रथम स्थान आकाश गरड यांनी पटकावले तर शितल तीरके व शिवानी एंगडे हिने व्दितीय व तृतीय स्थान पटकावले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. एस. टि. शिराले, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. चिक्षे, डॉ. अडकिने, शिलवंत आदीसह पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Share your comments