वनामकृवित जागतिक हवामान दिन साजरा

Tuesday, 26 March 2019 08:27 AM


परभणी:
बदलते हवामान, तापमानातील वाढ याचा शेती व सर्वसामान्‍याच्‍या जीवनावर परिणाम होत आहे. हवामानाविषयी भावी पिढीत जनजागृती करावी लागेल. बालवयातच वैज्ञानिक दृष्‍टीकोन विकासित करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍पांतर्गत ग्रामीण कृषी मौसम सेवा कार्यक्रम व परभणी एस्‍ट्रोनॉमिकल सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने जागतिक हवामान दिनानिमित्‍त दिनांक 23 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्‍यासपीठावर मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. कैलास डाखोरे, उपशिक्षणाधिकारी श्री. विठ्ठल भुसारे, प्रसिध्‍द हद्यरोग तज्ञ डॉ. रामेश्‍वर नाईक, डॉ. राजेश कदम, डॉ. एम जी जाधव, डॉ. डि. एम. नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, भारतीय समाजात ग्रहणे व खगोलशास्‍त्रीय इतर घडामोडीबाबत अनेक अंधश्रध्‍दा आहेत, त्‍या विज्ञानाच्‍या आधारे दुर केल्‍या पाहिजेत. विज्ञान व संशोधन क्षेत्रात डॉ. अब्‍दुल कलाम, डॉ. जयंत नारळीकर यांच्‍या सारख्‍या अनेक शास्‍त्रज्ञांनी मोठे योगदान दिले असुन अशा शास्‍त्रज्ञांचा वारसा आपण जपला पाहिजे. शेतीच्‍या दृष्‍टीने अचुक हवामान अंदाजास मोठे महत्‍व आहे, हवामान अंदाजात अचुकता आणण्‍यासाठी हवामानातील विविध बाबींची अचुक नोंदी घेणे गरजेचे असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. 

उपशिक्षणाधिकारी श्री विठठल भुसारे यांनी भाषणात कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान व कृषी सल्ल्याचा शेतकऱ्यांना मोठा उपयोग होत असल्‍याचे सांगितले तर डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामान विषयक प्रदर्शनीमुळे शालेय विद्यार्थ्‍यांना प्रेरणा प्राप्‍त होईल असे प्रतिपादन केले. प्रास्‍ताविकात डॉ. रामेश्‍वर नाईक यांनी परभणी एस्‍ट्रोनॉमिकल सोसायटी समाजात शास्‍त्रीय दृष्‍टीकोन विकसित करण्‍यासाठी जनजागृती कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करीत असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर सोनुनकर यांनी केले तर आभार प्रमोद शिंदे यांनी मानले

यानिमित्‍त आयोजित प्रदर्शनीत हवामान वेधशाळेशी निगडीत उपकरणे मांडण्‍यात आली होती तसेच परभणी शहरातील शाळेतील विद्यार्थ्‍यीनी हवामानाशी निगडित हवामान, जलचक्र, तापमान, तापमापी, प्रदुषण, ग्‍लोबल वार्मिंग, रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट, सोलार रेडिएशन, सौर ऊर्जा आदी विषयावर प्रयोगाचे सादरीकरण केले. उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्‍यी व शास्‍त्रज्ञ संवाद हवामान तज्ञांनी विद्यार्थ्‍यांच्‍या हवामान विषयक विविध प्रश्‍नांची उत्‍तरे दिली. कार्यक्रमास शहरातील शालेय विद्यार्थ्‍यांनी व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.  

सदरिल कार्यक्रमाचे आयोजन मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. कैलास डाखोरे, डॉ. रामेश्‍वर नाईक, सुधीर सोनुनकर, प्रसन्‍न भावसार, डॉ. सुधीर मोडक, डॉ. केदार खटींग, डॉ. राजेश मंत्री, डॉ. विजयकिरण नरवाडे, डॉ. पी. आर. पाटील, डॉ रणजित लाड, डॉ. जगदिश नाईक, ओम तलरेजा, अशोक लाड, प्रसाद वाघमारे, दिपक शिंदे आदींच्‍या पुढाकारांनी करण्‍यात आले होते. 

World Meteorological Day जागतिक हवामान दिन Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.