परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात भारतीय कृषी संशोधन परिषद व जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पातंर्गत प्रगत कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने दिनांक 11 ऑक्टोबर रोजी वैद्यनाथ वसतीगृहात विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांकरिता डिजीटल शेती व संशोधन यावर कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ. गोपाल शिंदे यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. राजेश कदम, डॉ. धीरज कदम, प्रा संजय पवार, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. भारत आगरकर, डॉ. श्याम गरूड, डॉ. विशाल इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. गोपाल शिंदे यांनी पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या संशोधनात डिजीटल शेती व डिजीटल साधनांचा विविध शेती कार्यात उपयोग करून शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपाय निर्माण करता येतील असे सांगुन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना डिजीटल शेती तंत्रज्ञानात काम करण्याची विविध संधीची माहिती दिली. जागतिकस्तरावर प्रगत देशात कृषी क्षेत्रात यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राचा वापर वाढत असुन हे तंत्रज्ञान भारतीय शेती व शेतकऱ्यांच्या परिस्थितीस अनुकूल बनविण्याची गरज असुन त्यासाठी लागणारे उच्चतम कौशल्य प्राप्त मनुष्यबळाची निर्मिती या प्रकल्पांतर्गत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी प्रकल्पांतर्गत विद्यापीठाने डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थेशी करार करण्यात आले असुन या संस्थेत प्रशिक्षण घेण्याची संधी कृषीच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्राप्त होणार असल्याचे सांगितले. याकरिता पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संशोधनात निवडतांना डिजिटल शेतीशी निगडीत विषय निवडावा प्रकल्पांतर्गत डिजिटल शेती क्षेत्रात आतंरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संशोधक, प्राध्यापक व विद्यापीठे यांचे संपर्क जाळे निर्माण करण्यात येणार आहे. कार्यशाळेत कृषी शाखा, अन्न तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, उद्यानविद्या शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.
जागतिकस्तरावर प्रगत देशात कृषी क्षेत्रात यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राचा वापर वाढत असुन डिजिटल शेती करून अधिक व दर्जेदार कृषी उत्पादन कार्यक्षमरित्या शेतकरी घेत आहेत. हे तंत्रज्ञान भारतीय शेती व शेतकऱ्यांच्या परिस्थितीस अनुकूल बनविण्याची गरज असुन त्यासाठी लागणारे उच्चतम कौशल्य प्राप्त मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास भारतीय कृषी संशोधन परिषदेने राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पातंर्गत प्रगत कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्रास पुढील तीन वर्षाकरिता मान्यता देण्यात आली आहे.
Share your comments