महिला शेतकरी केंद्रीत कृषि तंत्रज्ञान संशोधनावर भर देणार

Saturday, 04 January 2020 03:17 PM


परभणी:
महिलांमध्‍ये मोठी शक्‍ती आहे, आज अनेक क्षेत्रात महिलांनी आपली कर्तबगारी सिध्‍द केली आहे. ग्रामीण महिलाही शेती व शेती पुरक व्‍यवसाय मोठया यशस्‍वीरित्‍या करित आहेत. शेतीतील अनेक कष्‍टांची कामे महिलाच करतात. त्‍यांचे शेतीतील काबाडकष्‍ट कमी करण्‍यासाठी व शेतीतील कामे अधिक कार्यक्षमरित्‍या करण्‍यासाठी महिला केंद्रीत कृषि तंत्रज्ञान निर्मितीवर कृषि विद्यापीठ संशोधनाच्‍या माध्‍यमातुन भर देणार असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय, सामुदायीक विज्ञान महाविद्यालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त दिनांक 3 जानेवारी रोजी आयोजित महिला शेतकरी मेळाव्‍यात अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते.

मेळाव्‍याचे उदघाटन परभणी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. उज्‍वलाताई राठोड यांच्‍या हस्‍ते झाले तर प्रमुख अतिथी म्‍हणुन देवसिंगा (तुळजापुर, जि. उस्‍मानाबाद) येथील विजयालक्ष्‍मी सखी प्रोड्युसर कंपनीच्‍या अध्‍यक्षा तथा यशस्‍वी महिला उद्योजिका सौ. अर्चनाताई भोसले या उपस्थित होत्‍या. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य श्री. लिंबाजीराव देसाई, श्री. शरदराव हिवाळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य श्री. अजय चौधरी, प्रगतशील शेतकरी श्री. कांतराव देशमुख, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे, विद्यापीठ नियंत्रक श्री. एन. एस. राठोड, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ. जयश्री झेंडकृषि अधिकारी श्री. बी. एस. कच्छवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, विद्यापीठातील सामुदायीक विज्ञान महाविद्यालय, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी महिलांना उपयुक्‍त कृषि अवजारे तसेच शेती पुरक व्‍यवसाय, गृहउद्योग, प्रक्रिया उद्योग यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. याबाबत वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व कृषि विभाग यांच्‍या माध्‍यमातुन दिले जात आहे. याचा महिला बचत गटांना मोठा लाभ होऊन अनेक ग्रामीण महिला यशस्‍वीपणे व्‍यवसाय करित आहेत, ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे. मार्गदर्शनात परभणी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. उज्‍वलाताई राठोड म्‍हणाल्‍या की, आज महिला आपल्‍या कौटुंबीक जबाबदारी सांभाळुन कुंटूबासाठी अर्थाजन करित आहेत. बचत गटाच्‍या माध्‍यमातुन महिलांनी पुढे यावे, मेहनत व प्रामाणिकपणे कोणतेही कार्य केल्‍यास यश प्राप्‍त होते, असे मत व्‍यक्‍त केले.


सौ. अर्चनाताई भोसले आपल्‍या मनोगतात म्‍हणाल्‍या की, बचत गटांच्‍या माध्‍यमातुन महिला अनेक गृहउद्योग करित आहेत. रेशीम उद्योग, गांडुळ खत निर्मिती, अझोला निर्मिती, शेतमाल प्रक्रिया, दुग्‍धजन्‍य पदार्थ, कुक्‍कूटपालन आदी व्‍यवसायात महिला बचत गटांना मोठा वाव असुन व्‍यवसायाचे तंत्र शिकाण्‍याची गरज आहे, यासाठी कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागातुन मार्गदर्शन घेण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. सौ अर्चनाताई भोसले या विजयालक्ष्‍मी सखी प्रोड्युसर कंपनीच्‍या अध्‍यक्षा असुन त्‍यांनी एकविस महिला बचत गटांच्‍या माध्‍यमातुन हजारो महिलांना स्‍वयंरोजगार करण्‍यासाठी प्रवृत्‍त केले असुन स्‍वत:च्‍या पायावर सर्व महिला सक्षमपणे व्‍यवसाय सांभाळत आहेत.

स्‍वयंशिक्षणातुन क्रांती चळवळीतील श्रीमती गोदावरी क्षीरसागर यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले, त्‍या स्‍वत: कमी शिक्षीत असुनही आज सतरा देशाला त्‍यांनी भेट दिली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे यांनी कृषि विभागाच्‍या विविध योजनांचा महिला बचत गटांनी लाभ घेण्‍याचे आवाहन केले.

यावेळी कृषि तंत्रज्ञानावर आधारित कृषि प्रदर्शनीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तसेच विद्यापीठ दिनदर्शिका, विद्यापीठ मासिक शेतीभाती व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित घडीपत्रिका, पुस्तिका आदींचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याविषयी माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ. विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.

woman farmer Ashok Dhawan Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani महिला शेतकरी अशोक ढवण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.