ई-कॉमर्समधून बचतगट चळवळीला मिळणार चालना

24 January 2019 09:38 AM


मुंबई:
ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या धर्तीवर बचतगटांची उत्पादने आता ‘महालक्ष्मी ई-सरस’ या मोबाईल ॲप तसेच वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. बचतगटांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या ई-कॉमर्स व्यासपीठाचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अनावरण करण्यात आले. प्राथमिक टप्प्यात या ॲपवर बचतगटांची 50 उत्पादने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या माध्यमातून राज्यातील महिला बचतगट चळवळीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केला.

बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आज बचतगट आणि ग्रामीण कारागिरांच्या उत्पादनांच्या 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शनाचे राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. आजपासून 4 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन आणि विक्री सुरु राहणार आहे. प्रदर्शनात देशभरातील बचतगट सहभागी झाले असून 511 स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे 70 स्टॉल असून त्यातून मुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेता येणार आहे.

बचतगटांनी इन्शुरन्स, बँकिंग, सेवा क्षेत्रातही यावे- राज्यपाल

राज्यपाल श्री. राव यावेळी म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये 'महालक्ष्मी सरस' अंतर्गत महिला बचतगटांनी लक्षणीय प्रगती केली आहे. महिला बचतगटांची उत्पादने आता वर्षभर मिळू लागली आहेत. आज ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारखे रिटेलर्स तसेच डिपार्टमेंटल स्टोअर्सदेखील बचतगटांची उत्पादने ठेवू लागली आहेत. हा बचतगट चळवळीचा मोठा विजय आहे. महिला बचतगटांमुळे राज्यातील महिलांची मोठी सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

राज्यपाल म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासात सेवा क्षेत्र, उत्पादन क्षेत्र आणि कृषी क्षेत्र या तीन प्रमुख क्षेत्रांचे मोठे योगदान आहे. महिला बचतगटांनी आता कृषी व ग्रामीण उत्पादनांसोबत इन्शुरन्स, बँकिंग, तसेच इतर सेवा क्षेत्रातदेखील यावे. आज सेवा क्षेत्र वेगाने वाढत आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक प्रगती झपाट्याने होईल,असे ते म्हणाले. शासनाने याच ठिकाणी प्रदर्शनाला जोडून ज्ञान कौशल्य केंद्र’ (Knowledge & Skills Center) सुरु करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

बचतगट चळवळीशी जोडली गेली 40 लाख कुटुंबे- मंत्री पंकजा मुंडे

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, 50 लाख रुपयांच्या उलाढालीपासून सुरु झालेली महालक्ष्मी सरस प्रदर्शनाची चळवळ मागील वर्षी 10 कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचली आहे. यावर्षीही या प्रदर्शनातून बचतगट मोठी आर्थिक उलाढाल करतील. या प्रदर्शनात दुष्काळी भागातील नापिकीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबातील महिलाही सहभागी झाल्या आहेत. आपल्या उत्पादनांची विक्री करुन त्या आपले कुटुंब सावरत आहेत. महिला बचतगटांच्या अशा लाखो यशोगाथा आहेत. महिलांनी बचतगट चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला क्रांतिकारी गती दिली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

बचतगटांच्या 'उमेद' अभियानात राज्यात पूर्वी फक्त 8 जिल्ह्यांचा समावेश होता. मागील चार वर्षात राज्यातील 26 जिल्ह्यांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 'उमेद' अभियानांतर्गत साडेतीन लाख बचतगट काम करीत आहेत. 40 लाख कुटुंबे या अभियानाशी जोडली गेली असून त्यापैकी 8 लाख कुटुंबांना प्रशिक्षण देऊन व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. या कुटुंबातील महिला आता लघुउद्योजिका बनल्या आहेत, असेही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

यलो रिव्होल्युशनचाही प्रारंभ

राज्यात ज्याप्रमाणे सहकारी दूध संस्थांमार्फत शेतकऱ्यांचे दूध संकलन करुन त्याला शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते त्याच धर्तीवर ग्रामीण भागात कुक्कुटपालन करणाऱ्या महिला बचतगटांकडून उत्पादित होणाऱ्या अंड्यांचे संकलन करुन त्यांना आता शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठीच्या अभियानाचाही आजच्या कार्यक्रमात प्रारंभ करण्यात आला. राज्यात झालेल्या हरित क्रांती, धवल क्रांतीसारखी ही पिवळी क्रांती (यलो रिव्होल्युशन) असेल. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकेल, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

पहिल्या टप्प्यात पालघर आणि धुळे जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार आहे. यासाठी पथदर्शी प्रकल्पाचा आज प्रारंभ करण्यात आला. या दोन जिल्ह्यातील अनुभव लक्षात घेऊन लवकरच इतर ठिकाणी हा प्रकल्प सुरु करण्यात येईल, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. अस्मिता फंडामधून बालगृहातील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहेत. राज्यातील सुमारे 4 हजार मुलींना हे नॅपकिन्स दिले जातील. या मोहिमेचा शुभारंभही आज करण्यात आला. अस्मिता फंडामध्ये आतापर्यंत 22 लाख रुपये जमा झाले असून नागरिकांनी या निधीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कोकण आणि पुणे विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणारे बचतगट, उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट बँक शाखा यांना यावेळी राज्यपाल आणि ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांच्यासह राज्यभरातील बचतगटांच्या महिला प्रतिनिधी यावेळी उपस्थित होत्या.

महालक्ष्मी ई-सरस सी. विद्यासागर ॲमेझॉन फ्लिपकार्ट Pankaja Munde पंकजा मुंडे Amazon Flipkart Mahalaxmi Saras Mahalaxmi e Saras महालक्ष्मी सरस Yellow Revolution यलो रिव्होल्युशन asmita fund अस्मिता फंड umed उमेद
English Summary: woman self help groups market will be encouraged through e-commerce

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.