सातारा जिल्ह्यात काल वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला, अनेक ठिकाणी गारा पडल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच रायगाव तालुका जावली येथे शेतात काम करत असताना सौ. प्रतिक्षा अमर बगाडे वय - २८ या महिलेच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची बातमी पसरली. मात्र फक्त विजेचा कडकडाट ऐकून संबंधित महिला प्रचंड घाबरली. यातच तिला हृदयविकाराचा झटका आला असे सांगितले जात आहे. अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल आलेला नाही.
याबाबत अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. सातारा जिल्ह्यात संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण होऊन जोराचा गार वारा सुटला आणि आकाशात ढग दाटून आले. मात्र अशाही परिस्थितीत सकाळपासून शेतात राबणारा शेतकरी आणि मजूर आपले काम करत होता. दिवसभर रखरखणारे ऊन असून सुद्धा गावातील अनेक मजूर सुद्धा शेतात राबत होते.
दिवसभर काम करताना पावसाचे वातावरण होईल असा कोणताही अंदाज शेतकऱ्याला नव्हता. वादळी वाऱ्याचा जिल्ह्यात अनेक ठिकाणी तडाखा बसला असून शेतातील फळ बागांसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरात देखील जोराच्या वाऱ्यासह पाऊस सुरु झाल्याने रानाशिवारातील अनेक झाडे उन्मळून पडली. जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या गवताच्या गंजी उडून गेल्या. तर फळ बागांमध्ये विशिष्ट करून केळीच्या बागांचे अधिक नुकसान झाले.
रस्त्यावर झाडे पडून वाहतूक देखील विस्कळीत झाली. मत्रेवाडीतील धोंडिबा आणि सदाशिव मत्रे या दोन्ही भावंडांच्या घराचे पत्रे उडून गेले. घरात पाऊस पडून घरातील वस्तूंचे भिजून नुकसान झाले आहे. तर काहीकाळ परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. तर सातारा शहराला पावसाचा फटका बसला असून छत्रपती शाहू क्रिडा संकुलात सुरु असलेल्या कुस्ती स्पर्धेत बाधा आली असून पुढील सूचना येईपर्यंत कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.
त्यामुळे झालेल्या पावसाने कुस्ती शौकिनांच्या आनंदावर देखील पाणी फेरले आहे. दरम्यान आज देखील वातावरण असेच राहील असे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. काढणीला आलेल्या पिकांचे यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक मदतीची मागणी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत कर्ज, आजच आपले कार्ड बनवून घ्या..
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार पुण्यात, किंमत ऐकून वाटेल आश्चर्य, जाणून घ्या वैशिष्ट्य
मागेल त्याला शेततळे योजनेबाबत मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मोठा धक्का
Share your comments