भारत एक कृषिप्रधान देश आहे, आणि आपल्या या कृषिप्रधान देशाचा बळीराजा कणा आहे. मात्र असे असले तरी या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्याएक चिंतेचा विषय आहे. अवघ्या जगाला दोन वेळचे अन्न पुरवणारा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आत्महत्या करण्यास विवश झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पदरी कवडीमोल उत्पादन मिळत आहे याशिवाय प्राप्त झालेल्या उत्पादनास वाजवी बाजारभाव प्राप्त न झाल्याने शेतकरी राजाला उत्पादन खर्च देखील काढणे मोठ्या मुश्किलीचे होऊन बसले आहे. या अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे, अनेक शेतकरी राजाच्या डोक्यावर लाखो रुपयांचे सावकारी तसेच बँकेचे कर्ज झाले आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराजाला पोटभर अन्न देखील मिळत नाहीय, शेतीतून मिळत असलेल्या नेहमीच्या तुटपुंजी उत्पन्नात शेतकऱ्यांना उदरनिर्वाह भागविणे कठीण होऊन बसले आहे, त्यामुळेच बळीराजा आत्महत्या करण्यास विवश होताना बघायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचा समोर आलेला आकडा काळीज पिळवटून टाकणारा आहे. एका कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांनी आत्महत्या सारख्या टोकाचे पाऊल उचलणे हे संबंधित सरकारसाठी मोठी शरमेची बाब आहे. केवळ कृषिप्रधान देश म्हणून घेण्यासाठी देशातील सरकार धडपड करताना दिसत आहे मात्र कृषिप्रधान देशाचा कणा असलेल्या बळीराजाच्या विकासासाठी व त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार दरबारी ठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत. सरकारच्या शेतकऱ्यांबाबत असलेल्या उदासीन धोरणामुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. म्हणूनच राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे आणि ही बाब राज्यासाठी मोठ्या चिंतेची बनली आहे. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी शासन दरबारी काहीतरी ठोस उपाय योजना आखून त्याच्यावर अंमलबजावणी करणे अपरिहार्य ठरले आहे.
केंद्र सरकार तसेच राज्यातील सरकार देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुपटीने करण्याचा विचार करीत आहे फक्त विचारच करीत नाही तर हे केंद्र सरकारचे स्वप्न असल्याचे बोलले जात आहे. मात्र जर अशीच परिस्थिती राहिली, सरकारचे असेच उदासीन धोरण कायम राहिले तर सरकारचे हे स्वप्न सत्यात कधीच उतरणार नाही. तसेच वाढलेल्या आत्महत्या बघता सरकार केवळ प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नरत असण्याचा आव आणते की काय असा संतप्त सवाल शेतकरी बांधव उपस्थित करीत आहेत. शेतकरी आत्महत्या बाबत समोर आलेली माहिती मोठी धक्कादायक आहे. अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे विपक्ष सत्तापक्षवर घणाघात करत आहे. मात्र शेतकरी आत्महत्या सारख्या संवेदनशील मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. राज्यात जवळपास 14 जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून घोषित करावे लागले आहेत.
अमरावती जिल्ह्यात जवळपास 356 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातला हा आत्महत्याचा आकडा एका कृषिप्रधान देशासाठी अपमानास्पद आहे असे मत कृषी तज्ञाद्वारे व्यक्त केली जात आहे. कृषी तज्ञांच्या मते, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी बळीराजाच्या शेतमालाला सरसकट हमीभाव देण्याची योजना शासनाने लवकरात लवकर अमलात आणली पाहिजे. बळीराजाच्या शेतमालाला जर उचित मोबदला मिळाला तरच त्याचे जीवनमान उंचावू शकते आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत हा कृषिप्रधान देश म्हणवून घेण्यास योग्य असेल. अमरावतीत 356, यवतमाळ 299, बुलढाणा 285, अकोला 138, वाशीम 75 बीड 210, औरंगाबाद 172, उस्मानाबाद 126,परभणी:- 83,जालना:- 79,लातूर :- 64,हिंगोली :- 36, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी आत्महत्याचा हा आकडा सर्वांनाच अस्वस्थ करीत आहे.
Share your comments