राज्यात सध्या ऊसतोडणीच्या हंगाम सुरु झाला असून कारखाने जोरात सुरु आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काचे पीक म्हणून उसाकडे बघितले जाते. यामधून त्यांना चांगले पैसे देखील मिळतात. मात्र अनेक कारखाने सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याने अनेकांना ऊसदर कमी प्रमाणावर मिळतो, यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागतात. याचा घोळ दरवर्षीच सुरु असतो, असे असताना आता मात्र एक नवीनच घोळ सुरु झाला आहे. हा घोळ आहे उसाच्या वाड्याचा. यामुळे मोठी डोकेदुखी देखील ठरत आहे.
ज्या शेतकऱ्याच्या रानातला ऊस कारखाना तोडून नेतो, त्याच उसाचे राहिलेले वाडे उसतोड मजूर, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक घेऊन जातात. मात्र, ज्या शेतकऱ्याने त्याच्या रानात ऊस पिकवला त्याला हे वाडे मिळत नाही, अनेकदा यावरून मोठा वाद देखील बघायला मिळतो. शेतकऱ्यांचा जनावरांना हे वाडे मिळावे, यासाठी त्याचा प्रयत्न असतो. तसेच आपण ऊस तोडला म्हणून हे वाडे आपल्याला मिळावे अशी भूमिका ऊसतोड मजुरांची असते. मात्र यावर नेमका हक्क कोणाचा याबाबत अनेकदा प्रश्न निर्माण केला जातो.
उसाचे वाडे मिळावे यासाठी शेतकरी त्या ऊसतोड मजुराच्या मागे दिवसभर फिरत असतात. मात्र जाताना दोन चार वाड्याचे भेळे टाकून निघून जातात. तसेच त्यांच्या अनेक मागण्या असतात. आणि शेतकरी मात्र आपला ऊस लवकर जाईल आणि तोडणी व्यवस्थित होईल म्हणून त्याच्या मागण्या मान्य करतात. अनेक ठिकाणी तोडणी आली की ऊसतोड मजूर जेवणाची मागणी करतात. यामध्ये प्रामुख्याने कोंबडीच असली पाहिजे ही त्यांची मागणी असते. असे असले तरी शेतकऱ्यांना वाडे मिळत नाही. ऊसतोड मजूर हे वाडे जनावरांना म्हणून घेऊन जातात, मात्र कारखाना परिसरात तेच वाडे ५०० रुपये शेकड्याने विकतात. आणि यामधून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवतात.
त्यांच्या मर्जीप्रमाणे केले नाहीतर ते ऊसतोड लांबवतात, तसेच ऊसतोड देखील व्यवस्थित करत नाहीत, याची अनेक उदाहरणे बघायला मिळतील. यामुळे साखर कारखान्यांनी यामध्ये लक्ष घालून ऊसतोड करणाऱ्या मजुरांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार करून देखील यावर ठोस असा निर्णय घेतला जात नाही. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यामुळे ऊसतोड आली की हा वाद ठरलेलाच आहे. यामुळे उसाच्या वाड्यावर नेमका हक्क कोणाचा असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
Share your comments