खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला मोठा फटका बसला होता. अतिवृष्टी व त्यानंतर बदललेल्या वातावरणामुळे कापूस पिकावर बोंड आळीचे सावट संपूर्ण हंगामभर कायम होते, या प्रतिकूल वातावरणामुळे कापसाच्या उत्पादनात कमालीची घट झाली. कापसाच्या उत्पादनात झालेली घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेली कापसाची मागणी या एकत्रित समीकरणामुळे या हंगामात कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. कापसाला जवळपास दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा संपूर्ण हंगामभर दर बघायला मिळाला.
आता हंगामाच्या शेवटी बुलढाणा जिल्ह्यातुन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्याच्या देऊळगाव राजा एपीएमसीमध्ये कापसाला उच्चांकी दर मिळत आहे. एपीएमसीमध्ये कापसाच्या दरात वाढ झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी साठवलेला कापूस विक्रीसाठी बाहेर काढला आहे. सध्या बाजारपेठेत दहा हजार रुपये प्रतिक्विंटल पासून ते दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत आहे. कापसाला सध्या मिळत असलेला बाजार भाव हा या हंगामाच्या उच्चांकी दर असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
देऊळगाव राजा तालुक्यात या हंगामात अपेक्षेपेक्षा कमी कापसाची लागवड नमूद करण्यात आली, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि कापसासाठी वाढलेला खर्च यामुळे बळीराजाने कापसाऐवजी खरीप हंगामात सोयाबीन लागवडीसाठी अधिक पसंती दर्शवली.
यामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली आणि अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढली कापसाची मागणी वाढल्याने सध्या बाजारपेठेत कापसाला विक्रमी दर प्राप्त होत असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले गेले. मध्यंतरी कापसाला मिळत असलेला दर अपेक्षेपेक्षा कमी असल्याने अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पांढऱ्या सोन्याची साठवणूक करण्याचे ठरवले कापूस उत्पादक शेतकर्यांचा हा निर्णय सध्या फायदेशीर ठरत असल्याचे बघायला मिळत आहे. सध्या कापसाला अपेक्षित बाजार भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी साठवलेला कापूस पुन्हा एकदा विक्रीसाठी काढला आहे त्यामुळे देऊळगाव राजा एपीएमसीमध्ये कापसाची मोठी आवक नमूद करण्यात आली आहे.
दिवाळीच्या काळात कापसाला अपेक्षित बाजार भाव मिळत नव्हता त्यामुळे भाववाढीच्या अनुषंगाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली होती मात्र आता बाजारपेठेत कापसाला सुयोग्य दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढला आहे. देऊळगाव राजा एपीएमसीमध्ये मिळत असलेला दर समाधानकारक असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
Share your comments