माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान योजनेचा निधी हस्तांतरित केला. मोदींनी नाताळच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता ट्रान्सफर केला. दरम्यान केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे केले आहेत. हे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद झाल्यानंतर मोदींनी शेतकऱ्यांना उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी तीन नव्या कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.
हा कायदा कसा योग्य आहे, त्यात शेतकऱ्यांचे कसे हित दडले आहे. ते सविस्तरपणे समजावून सांगितले.कृषी सुधारणा कायद्यांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “नव्या कायद्यामुळे शेतकरी त्यांचे उत्पादन हवे तिथे विकू शकतात. जिथे तुम्हाला चांगला मोबदला मिळेल, तिथे तुम्ही पिकवलेली वस्तू विका”. “तुम्हाला बाजारपेठेत, खरेदीदारांना उत्पादन विकायचे असेल, तर विकू शकता. शेतकऱ्यांना हे स्वातंत्र्य मिळत असेल तर त्या सुधारणांमध्ये चुकीचे काय आहे?” असा सवाल मोदींनी केला.“काही लोकांना फक्त खोटी माहिती पसरवण्यामध्ये रस आहे. या कायद्यामुळे बाजारपेठ आणि एसएसपी पद्धत जाईल असे पसरवले जात आहे. पण असे काही घडणार नाही” असे मोदी म्हणाले. “नवे कृषी कायदे शेतकऱ्याला बळ देणारे आहेत. आधी शेतकऱ्यासाठी जोखीम जास्त असायची. पण आता उलटं झालं आहे. शेतकरी अधिक सुरक्षित असेल तर करार करणाऱ्याला किंवा कंपनीची जोखीम जास्त असेल” असे मोदींनी सांगितले.
“शेतकऱ्याला वाटलं तर तो करार रद्द करु शकतो पण करार करणारी कंपनी असा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आमच्या सरकारला विरोध करणाऱ्यांबरोबरही आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण तर्क आणि मुद्यांवर चर्चा होईल” असे मोदींनी स्पष्ट केले.दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले. त्यानंतर सरकारच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना कसा लाभ होतोय, हे त्यांच्याकडून जाणून घेतले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीय. तिथले सरकार राजकीय कारणांमुळे हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नसल्याचे सांगत मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.
Share your comments