खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणार्या कापूस आणि सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट झाली. उत्पादनात घट झाली की बाजारभावात वाढ होते हे बाजारपेठेतील गणित आहे यालाच अनुसरून कापसाला यंदा कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. अजूनही कापसाचे बाजार भाव कायम आहेत, मात्र असे असले तरी कापसाला विक्रमी बाजार भाव प्राप्त होऊनही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा तोटा होताना बघायला मिळत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या जिकरीने कापसाचे उत्पादन घेतले आहे, आता पदरी पडलेली उत्पादन विक्री करताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचाच प्रत्येय समोर आला आहे तो अमरावती जिल्ह्यातून. जिल्ह्यातील दर्यापूर बाबळी समर्थ जिनिंग-प्रेसिंग मध्ये मापात पाप होत असल्याची घटना समोर आली आहे. छोटे-मोठे पाप नव्हे तर तब्बल 45 किलोचे पाप.
जिनिंग प्रेसिंग च्या काट्यात झोल असल्याची तक्रार देखील बाजार समितीत देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे शिवारातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हिंगणी मिर्झापूर येथील रहिवासी कापूस उत्पादक शेतकरी सुभाष गावडे यांनी दर्यापूर येथे कापूस विक्रीसाठी आणला. रविवारी विक्रीसाठी आणलेल्या कापसाचे वजन त्यांनी बाजार समितीच्या फ्लॅट काट्यावर केले. ट्रॉलीत विक्रीसाठी आणलेल्या कापसाचे वजन बाजार समितीच्या काट्यावर 27 क्विंटल एवढे वजन भरले. वजन केल्यानंतर या शेतकऱ्याने कापसाची विक्री करण्यासाठी बाभळीचे समर्थ जिनिंग-प्रेसिंग गाठले. मात्र त्या ठिकाणी कापसाचे वजन तब्बल 45 किलोने कमी भरले. परंतु शेतकऱ्याने याबाबत तक्रार केली असता, संचालकांनी बाजार समितीच्या काट्या नुसार पैसे देण्याचे मान्य केले. मात्र संचालकाच्या बोलण्यात खोटं होती, त्यामुळे त्यांनी एकाच ट्रॉलीत भरलेल्या कापसाला 10,350, 10,000 आणि 8800 प्रति क्विंटल असा भाव देण्याचे ठरवले.
यासंदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये लेखी तक्रार देखील नोंदवली आहे. बाजार समितीने अधिक माहिती देताना सांगितले की, "समर्थ जिनिंग-प्रेसिंग विरोधात आमच्याकडे लेखी तक्रार आली आहे आणि त्या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल व तद्नंतर कारवाई केली जाणार आहे".
जिनिंग प्रेसिंग मध्ये होत असलेल्या या अनैतिक व्यवहारामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी भाव मिळूनही तोटा होत असल्याचे सांगितले जात आहे.
कधी नव्हे तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या हंगामात कापसापासून चांगले उत्पन्न प्राप्त होण्याची आशा आहे मात्र शेतकऱ्यांची ही आशा काही दलाल लोक पूर्ण होऊ देऊ इच्छित नसल्याचे मत संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
Share your comments