पुणे, यावर्षी ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत, याचे कारण म्हणजे उसाचे क्षेत्र वाढल्याने ऊस तोडणीसाठी मोठा उशीर होत आहे. यातच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी वीज तोडली जात आहे. यामुळे पीक जळून जात आहे. यामुळे ऊस लवकरात लवकर तोडावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. तोडणी लांबत असल्याने उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. शिवाय क्षेत्र रिकामे होत नसल्यामुळे इतर पिके शेतकऱ्यांना घेता येत नाहीत. सध्या ऊसाला तुरे आले असून आता वजनात घट झाली तर केलेला खर्चही पदरात पडतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
राज्यात सध्या 191 साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसाचे गाळप होत असताना देखील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. ऊसाचा कार्यकाळ संपूनही ऊस वावरातच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सध्या अनेक ठिकाणी ऊस जळू लागला आहे. तसेच इतर कमी कालावधीची पोके देखील घेता येत नाहीत. वेळेत तोड न झाल्यास ऊस पोकळ होण्यास सुरवात होते, यामुळे वजनात मोठी घट जाणवते. अशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. असे असले तरी कारखाना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
अनेक ठिकाणी वशिलेबाजी केली जात आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कारखान्याचे संचालक हे लगतच्या भागातील शेतकऱ्यांचाच ऊसतोडणीला प्राधान्य देतात. लागवडीनंतर 12 महिन्यामध्ये ऊसाचे गाळप होणे गरजेचे आहे. मात्र असे होत नाही. वेळेत तोड मिळावी ही शेतकऱ्यांची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. सध्या राज्यातील सर्वच कारखान्यांवर अशीच परिस्थिती आहे. यामुळे आपला ऊस तोडण्यासाठी जास्तीचे पैसे देखील शेतकऱ्यांना द्यावा लागत आहेत.
ऊस लागवडीच्या नोंदी ह्या साखर कारखान्याकडेही असतातच. मात्र अनेक दिवस झाले तरी नंबर येत नाहीत. यामुळे पुढील आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे साखरेच्या दर्जावरही त्याचा परिणाम होणार आहे. ऊस फडातच राहणार अशी भीती अनेक शेतकऱ्यांना सध्या सतावत आहे. अनेक ठिकाणी ऊसतोड कर्मचाऱ्यांना मटणाचे जेवण पैसे द्यावे लागत आहेत, तसेच ते दिले नाही तर ते कर्मचारी देखील तोडणीस मुद्दाम उशीर लावत आहेत. यामुळे सध्या ऊस उत्पादक शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत आहेत.
Share your comments