केरळमध्ये गुरुवारी मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने बुधवारी जाहीर केले. हवामान विभागाने यंदा सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त के ला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पण मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे?, अनेकदा हे दोन शब्द वापल्या वाचनात येतात. पण त्याचा नक्की अर्थ काय? या दोघांमध्ये काय फरक असतो ?…
जून महिना जवळ आला की सगळीकडे मान्सून कधी येणार अशी चर्चा सुरु होते. मे महिन्यात किंवा जूनच्या सुरुवातील आलेला पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व आणि विशिष्ट तारखेला येणारा पाऊस म्हणजेच मान्सून असेही हवामान खाते आणि हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जाते. पण हा मान्सून नेमका ओळखायचा कसा? त्या विशिष्ट पावसालाच मान्सून का म्हणायचं असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात.
मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला काही सामान्य निरीक्षणांवरुनही ओळखता येतो.
१. मान्सूनपूर्व पावसादरम्यान दिवसभर खूप उकडते, हा उकाडा असह्य होतो आणि मग पाऊस कोसळतो. मान्सूनमध्ये ढग जमा होतात. ऊन आणि सावली यांचा खेळ सुरु होतो, काहीवेळा संथ वाराही वाहतो आणि मग हा पाऊस पडतो.
२. मान्सूनपूर्व पावसात उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. वारा खालून वर जातो आणि बाष्प साठून पाऊस येतो. मान्सूनमध्ये ढग जमिनीला समांतर दिशेने पुढे पुढे सरकतात आणि पाऊस पडण्यास सुरुवात होते.
३. मान्सूनपूर्व पावसाचे ढग दाट असतात तसेच त्याची जाडी आणि उंचीही खूप असते. मान्सूनचे ढग तितके उंच नसतात. त्याची जाडीही कमी असून ते पसरलेले असतात.
४. मान्सूनपूर्व पाऊस स्थानिक आणि कमी पट्ट्यात पडतो तर मान्सून तुलनेने जास्त टप्प्यात विस्तृत दिसतो.
५. मान्सूनपूर्व पाऊस गडगडाटी, धडाकेबाज आणि रौद्र असतो. मान्सून संततधार, संथ आणि शांतपणे येतो.
याशिवाय शास्त्रीय दृष्ट्याही मान्सूनपूर्व आणि मान्सून ओळखण्याच्या काही पद्धती आहेत. त्या खालीलप्रमाणे…
१. मान्सूनमध्ये वाऱ्याची दिशा, गती यांचा अभ्यास केलेला असतो. त्यानुसार या पावसाचा अंदाज बांधता येतो. मान्सून नैऋत्य दिशेने येतो. मान्सूनपूर्व पावसासाठी असे विशेष कोणते अंदाज नसतात.
२. आकाश ढगांनी किती आच्छादलेले आहे यावरुन मान्सून ओळखता येऊ शकतो. मान्सूनपूर्वमध्ये असा निकष लावता येत नाही.
३. मान्सून केरळमध्ये आला हे ओळखण्यासाठी त्या विशिष्ट ठिकाणी काही जागा निश्चित केली जाते. त्या ठिकाणी विशिष्ट प्रमाणात पाऊस पडल्यास तो मान्सून आहे असा निष्कर्ष बांधता येतो.
४. याशिवाय ढगांचा पट्टा कुठपर्यंत सरकला आहे यानुसार मान्सून ओळखता येतो. हे मोजण्याच्या काही शास्त्रीय पद्धती आहेत. त्यांचा अभ्यास करुन मान्सूनची ओळख पटते.
देश आणि मुख्यतः शेतकरी ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात तो मान्सून की मान्सूनपूर्व हे वरील काही निकषांवरून ओळखता येते. मान्सून नेमका कधी येणार आणि त्याआधी आलेला पाऊस हा मान्सूनपूर्व आहे का, हे ओळखता येण्यासाठी काही किमान निरीक्षणे नोंदवल्यास सामान्यांनाही यातील फरक कळू शकतो, असे ‘भवताल’ मासिकाचे संपादक आणि पर्यावरणविषयक पत्रकार अभिजित घोरपडे यांनी ‘लोकसत्ता डॉटकॉम’ला सांगितले.
Share your comments