तूर उत्पादक शेतकऱ्यांना दोन वर्षापूर्वी निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठा फटका बसला होता दोन वर्षापूर्वी वातावरणात झालेल्या बदलामुळे तुरीच्या उत्पादनात घट झाली होती. उत्पादनात घट झाली म्हणजे बाजारभावात वाढ होते तेव्हादेखील तुरीच्या बाजार भावात विक्रमी वाढ झाली होती. बाजार भाव जवळपास दहा हजार रुपये प्रति क्विंटल ज्या घरात पोहचले होते. मात्र असे असले तरी त्यावेळी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने तुरीच्या साठवणुकीचा निर्णय घेतला. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्याच्या तूर उत्पादक शेतकऱ्यांनी दोन वर्षापुर्वी भाववाढीच्या आशेने तुर साठवून ठेवली आहे.
तालुक्यात सोयाबीन आणि तूर हे दोन मुख्य पीक असून या पिकांची मिश्र शेती करण्यास शेतकरी बांधव प्राधान्य देतात. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2020 मध्ये तालुक्यात साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड बघायला मिळाली होती. परंतु 2020मध्ये वातावरणात प्रतिकूल बदल झाला आणि तूर पिकात मर रोगाचा मोठा प्रादुर्भाव बघायला मिळाला परिणामी उत्पादनात मोठी घट झाली. उत्पादनात घट झाली असल्याने व तुरीची मागणी त्यावेळी वाढली होती त्या अनुषंगाने तुरीच्या दरात विक्रमी वाढ झाली. त्यावेळी तुरीला जवळपास दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत होता. मात्र त्यावेळी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अनुषंगाने तुरीची साठवणूक केली. तूर उत्पादक शेतकऱ्यांना तुरीच्या दरवाढीबाबत 100% शाश्वती होती. म्हणून विक्रमी दर असतानादेखील तूर उत्पादकांनी तुरीची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला.
मात्र तेव्हापासून आत्तापर्यंत तुरीच्या दरात घसरणच बघायला मिळत आहे. दोन वर्षापासून तुरीचे दर सहा हजारच्या आसपासच फिरत आहेत. तुरीच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांची चढ-उतार बघायला मिळते. सध्या घडीला मिळत असलेल्या दरात तुरीचा उत्पादन खर्च देखील काढणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच 2020 प्रमाणे 2021 मध्ये देखील अवकाळी पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे तुरीमध्ये मररोग बघायला मिळाला परिणामी उत्पादनात याहीवर्षी घट झाली. म्हणून तुरीचे दर वाढतील अशी शेतकर्यांची आशा आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार भाववाढीच्या आशेने तालुक्यातील जवळपास दोनशे तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक करून ठेवली आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, तुरीपासून हमखास उत्पादन मिळत असल्याने आणि तुरीला चांगला बाजारभाव प्राप्त होतो म्हणून दोन वर्षापूर्वी तुरीच्या क्षेत्रात मोठी वाढ नमूद करण्यात आली होती. मात्र, तेव्हापासून तुरीला कवडीमोल दर प्राप्त होत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या भाबड्या आशा फोल ठरत असल्याच बघायला मिळत आहे.
Share your comments