पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नगर जिल्ह्यात विविध कामांचे उद्घाटन पार पडले आहे. यावेळी शेतकरी महासन्मान मेळावा देखील पार पडला आहे. या मेळाव्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील एक नेते केंद्रीय कृषिमंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांनी काय केले? अशी टीका नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांसमोरच शरद पवारांवर केली आहे. वैयक्तिकरित्या त्यांचा मला सन्मानआहे. पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं असा सवाल देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थित केला आहे. तसंच शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना एमएसपीचे पैसे मिळत नव्हते, असंही मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत 7,500 कोटींच्या कामांचं लोकार्पण करण्यात आल आहे. तसेच निळवंडे धरणाच्या कालव्याचा लोकार्पण करण्यात आले. त्याच बरोबर शिर्डी संस्थानच्या नव्या इमारतीचे आणि शिर्डीतील दर्शन रांग संकुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडले.
सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साई बाबाचे दर्शन घेतले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या कालव्याचा लोकार्पण करण्यात आले.निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे 182 गावांतील जमिनी ओलीता खाली जाणार आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते. शिर्डी येथील काकडी येथे कार्यक्रमादरम्यान मंत्री विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना संबोधीत केलं आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले .
Share your comments