सागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. याचबरोबरीने सागरी शेवाळाच्या व्यावसायिकदृष्टीने उपयुक्त २५० जातींचे संवर्धन होणार आहे. याचा पर्यावरण संवर्धनासाठी फायदा होणार आहे. समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये सागरी शेवाळाचे उत्पादन हा व्यावसायिकदृष्ट्या चांगला पर्याय आहे. निसर्गतः खाऱ्या पाण्यात येणाऱ्या काही निवडक शेवाळ जातींचे सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंबकरून उत्पादन घेता येते. यामध्ये हरित शेवाळ, लाल शेवाळ आणि तपकिरी शेवाळ असे प्रकार आहेत. शेवाळ उत्पादनामध्ये जमिनीवरील शेतीप्रमाणे लागवडीआधी तसेच लागवडीनंतर मशागतीची गरज नाही. लागवडीनंतर कृत्रिम खते व खनिजे वापरायची गरज नाही. जमिनीवरील शेतीप्रमाणे वारंवार देखभालीची गरज नाही.
जगात आज ३२ दशलक्ष टन सागरी शेवाळाचे उत्पादन घेतले जाते. त्यातील ९७ टक्के उत्पादन हे मानवनिर्मित शेतीद्वारे घेतले जाते, तर ३ टक्के हे खुल्या समुद्रातून नैसर्गिकरीत्या होते. शेवाळाच्या २०० जातींपैकी १२ जातीच्या शेवाळांचे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते. जागतिक बाजारपेठेत लॅमिनारिया (९३.८० टक्के), जपोनिका (३५.३५ टक्के), उकेमा (२८.५२ टक्के), ग्रासिलारिया (१०.६७ टक्के), उंडारिया पिंनाटिफिडा (७.१६ टक्के), पोरफायरा (७.१६ टक्के), कप्पाफायकस अल्वारेझी (४.९३ टक्के) या शेवाळांच्या जातींना चांगली मागणी आहे.
शेवाळाचे व्यावसायिक फायदे
शेवाळापासून अगार, केराजीनान, अल्जिनेट या पदार्थांची निर्मिती केली जाते. या उत्पादनांना जागतिक मागणी आहे.
तपकिरी, हिरव्या शेवाळाचा वापर प्रामुख्याने मानवी खाद्य तसेच पशुखाद्यासाठी केला जातो. शेवाळ हा कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, गायी, डुक्कर यांच्यासाठी उत्तम प्रथिनांचा स्रोत आहे. याचा पशुखाद्यात वापर केल्याने जनावरांची भूक वाढते.
मागील काही वर्षांपासून भारतात कॅप्पाफायकस अल्वारेझी या लाल रंगाच्या शेवाळाचे उत्पादन घेतले जाते. हे शेवाळ कॅराजीनानचा प्रमुख स्रोत आहे. याचा वापर मिठाई, चीज, सॉस, जेली निर्मितीमध्ये केला जातो. इंटरोमॉर्फा शेवाळाचा वापर पदार्थामध्ये गार्नेसिंगसाठी केला जातो. या शेवाळामधून आयोडीन, मॅग्नेशिअम, सेलेनियम आणि बरेच पोषक घटक मिळतात. जे आपल्या पारंपरिक खाद्य पदार्थातून फारसे मिळत नाहीत.
शेवाळाचा सौंदर्यप्रसाधने निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रामुख्याने ब्राऊन शेवाळाचा वापर यामध्ये जास्त प्रमाणात होतो.
औषध निर्मितीमध्ये देखील सागरी शेवाळाचा वापर वाढला आहे.काही जातींच्या शेवाळाचा वापर वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये करतात.
शेवाळांपासून खतनिर्मिती देखील केली जाते. विशेषतः कॅप्पाफायकस शेवाळाचा वापर खतनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. याचबरोबरीने काही प्रमाणामध्ये कीटकनाशके व बुरशीनाशकांसाठी जैविक रसायन म्हणून शेवाळाचा वापर होत आहे. शेवाळापासून तयार केलेल्या खतामुळे मका, बटाटा, भात, इतर कडधान्यामध्ये २० टक्के उत्पादन वाढ दिसून आली आहे. काही सागरी शेवाळांचा वापर इंधननिर्मितीसाठी देखील होऊ लागला आहे.
सागरी शेवाळ उत्पादनाला संधी
जगाचा विचार करता समुद्री शेवाळ उत्पादनामध्ये चीन (५५ टक्के), इंडोनेशिया (२५ टक्के), फिलिपिन्स (९ टक्के), दक्षिण कोरिया(५ टक्के), उत्तर कोरिया (२ टक्के), जपान (२ टक्के) हे देश आघाडीवर आहेत. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन अनेक देश सागरी शेवाळ उत्पादनाकडे वळले आहेत. भारतात तमिळनाडू राज्यात समुद्री शेवाळ उत्पादनाला चालना मिळाली आहे. भारताचा समुद्रकिनाऱ्याचे क्षेत्र लक्षात घेता दरवर्षी १७ लाख टन समुद्री शेवाळाचे उत्पादन घेणे शक्य आहे. परंतु सद्यःस्थितीमध्ये फक्त २५ हजार टन सागरी शेवाळाचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र राज्याला जवळपास ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याचा वापर सागरी शेवाळ उत्पादनासाठी शक्य आहे.
सागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. याचबरोबरीने सागरी शेवाळाच्या व्यावसायिकदृष्टीने उपयुक्त २५० जातींचे संवर्धन होणार आहे. याचा पर्यावरण संवर्धनासाठी फायदा होणार आहे. सागरी शेवाळाच्या उत्पादनामुळे समुद्राचे तापमान वाढ कमी होण्यास मदत मिळेल. अनेक जातींच्या माशांना अंडी घालण्यासाठी तसेच राहण्यासाठी उत्तम निवारा मिळेल. त्यामुळे मासे तसेच इतर जिवाच्या संख्येत देखील चांगली वाढ होईल.
प्रतिनिधी गोपाल उगले
Share your comments