सध्या राज्यात सर्वत्र उन्हाळी हंगामातील कांदा काढणी प्रगतीपथावर आहे, खरिपातील लाल कांदा देखील बाजारात येत असून आता उन्हाळी कांदा बाजारपेठेत दाखल होऊ लागल्याने कांद्याच्या आवक मध्ये मोठी वाढ झाली आहे. यादरम्यान, मार्च एंडिंग मुळे कांद्याच्या मागणीत दिवसेंदिवस घट होत असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळेदेखील कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याचे व्यापारी लोक सांगत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी 100 रुपये प्रति क्विंटल ते 1400 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान बाजार भाव मिळाला. सध्या मिळत असलेल्या या कवडीमोल बाजारभावात वाहतूक खर्च काढणे देखील अशक्य होणार असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत.
शुक्रवारी सोलापूर एपीएमसी मध्ये सुमारे 325 गाड्यांची आवक झाली होती. नेहमीप्रमाणे बाजार समितीत सकाळी दहानंतर कांदा लिलाव सुरू झाला. मात्र, कांद्याला बाजारपेठेत मागणी नसल्याने शंभर रुपये प्रति क्विंटल ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल या दरम्यानच कांद्याला भाव मिळाला.
चांगल्या दर्जाचा कांदा आठशे रुपये प्रति क्विंटल ते बाराशे रुपये प्रतिक्विंटल दरम्यान विक्री झाला. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला असून उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य असल्याने त्यांची आर्थिक कोंडी बघायला मिळत आहे. दुय्यम दर्जाच्या कांद्याला तर अतिशय कवडीमोल दर होता त्यामुळे अशा शेतकऱ्यांना बारदानाचा खर्च काढणे देखील शक्य झाले नसल्याचे सांगितले जात आहे.
सोलापूर एपीएमसीमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव प्राप्त होईल या भोळ्या भाबड्या आशेने बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, पुणे व बीड या जिल्ह्यातून अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोलापूर एपीएमसी मध्ये कांदा विक्री करण्यासाठी आणला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या लिलावात कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळाल्याने या शेतकऱ्यांच्या आशा फोल ठरल्या असून कांद्याने या शेतकऱ्यांना अक्षरशः रडवून सोडले.
दरम्यान, देशांतर्गत सर्वच कांदा बाजारपेठेत कांद्याची मोठी आवक होत असल्याने दर कोसळल्याचे व्यापारी सांगत आहेत. महाराष्ट्रात देखील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होऊ लागल्याने याचा परिणाम कांद्याच्या दरावर दिसू लागला आहे.
कांद्याची वाढलेली आवक आणि मार्च एंडिंग असल्यामुळे कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीकडे पाठ फिरवल्याने कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान काही व्यापाऱ्यांनी पुढच्या महिन्यात कांद्याच्या दरात थोडीफार वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. एकंदरीत परिस्थीती बघता कांदा पुन्हा बेभरवशाचा ठरला.
संबंधित बातम्या:-
शेतकऱ्यांमागची साडेसाती कधी संपेल! आता टोमॅटोचे दर घसरल्याने; टोमॅटो उत्पादक अडचणीत
'या' पद्धतीने झेंडु लागवड आपणांस बनवु शकते लखपती! वाचा याविषयी
Share your comments