शेतकऱ्याला दावणीला बांधलेले जनावर आपल्या परिवाराप्रमाणेच असतात. तो एक वेळ उपाशी का झोपेना पण आपल्या दावणीला बांधलेल्या जनावरांना पोटभर खुराक उपलब्धच करेन मग यासाठी त्याला काहीही कराव लागलं तरी चालेल.
शेतकरी आणि त्याच्या दावणीला बांधलेल्या जनावरांचे नाते खूपच अनमोल असते. याचाच प्रत्यय समोर आला आहे पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातून. तालुक्याच्या वेनवडी येथील चव्हाण कुटुंबीयांनी आपल्या गाईचे डोहाळे जेवणाचा विधी पार पाडला. यावेळी गाईला एखाद्या सुवासिनी स्त्रीप्रमाणे सजवण्यात आले होते. गाईला हिरवी साडी, फुलांच्या माळा लावून छान सजवण्यात आलं होतं. या अनोख्या सोहळ्यासाठी मौजे बेनवडी येथील सर्व ग्रामस्थ समाविष्ट झाले होते.
ज्या पद्धतीने एखाद्या स्त्रीचे डोहाळे जेवण घातले जाते अगदी त्याच धर्तीवर गाईचे डोहाळे जेवण घातले गेले. या वेळी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे गाईचे औक्षण व इतर विधी पूर्णत्वास नेला गेला. एखाद्या सुवासिनीच्या डोहाळे जेवणाला देखील धोबीपछाड देईल असा हा नेत्रदीपक सोहळा पार पडला.
या सोहळ्याला गावातून तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांनी हजेरी लावली. गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उरकताच आलेल्या पाहुणे मंडळींसाठी खास मेजवानी देखील देण्यात आली होती. चव्हाण कुटुंबीयांनी सर्व काही हिंदू रितीरिवाजाप्रमाणे पार पाडले.
या कार्यक्रमाचे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांनी तसेच सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांनी तोंड भरून कौतुक देखील केले. विशेष म्हणजे गाईच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी भजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
हिंदू रितीरिवाजाप्रमाणे कुठल्याही सुवासिनी बाईच्या डोहाळे जेवणासाठी भजन ठेवतात अगदी त्याचप्रमाणे चव्हाण कुटुंबीयांनी यावेळी देखील भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. एकंदरीत कोणतीही कसर न सोडता चव्हाण कुटुंबीयांनी गाईची सर्व हौस पुरवली, यामुळे चव्हाण कुटुंबीयांचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.
संबंधित बातम्या:-
लई भारी! एकाच वेळी गाईने दिला दोन वासरांना जन्म; शेतकऱ्याने पेढे वाटून केला आनंद साजरा
शेतकऱ्याने केले वासराचं बारसं! बारसं करण्याचे कारण जाणुन तुम्हीही व्हाल भावुक
Share your comments