परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा कंबरडं मोडलं. मराठवाडा, कोकण, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक पावसामुळे वाया गेले आहे. शेतकरी संकटात सापडलेला असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत यावरुन विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने महाविकास आघाडी सरकारला चांगलंच कोंडीत पकडले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांना राज्य सरकार कमी मदत करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून वारंवार होतो आहे. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं आणता येत नाही. राज्याच्या हक्काचे GST चे पैसे अद्याप केंद्राकडून आलेले नाहीत. ते आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अधिक मदत होईल. पण तोपर्यंत आम्ही वाट पाहणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जे काही करणं शक्य असेल ते केले जाईल. काही दिवसांमध्ये दसरा येतोय, त्यानंतर दिवाळी येतेय. सणासुदीला राज्यातल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही ही माझी जबाबदारी आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा बिल्ला मी शोभेसाठी खिशावर लावलेला नसल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. दरम्यान आपण
जे करू ते ठोस आणि ठाम करू. सरकार मदतीसाठी वचनबद्ध आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मदत कशी करायची यावर चर्चा सुरु आहे. मदत कशी करायची यावर आज-उद्या ठोस निर्णय घेतला जातला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत दिले.
आज उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल, पंचनामे होत आले आहेत, लवकरच मदत मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आज दिले. लोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही, मी दिलासा द्यायला आलो आहे, आधार द्यायला आलो आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा करणे टाळले. मुख्यमंत्री आज उस्मानाबादमध्ये दौरा करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तुळजापूर तालुक्यातील काटगावमधील पूरग्रस्तांना धीर दिला. काळजी करु नका हे तुमचे सरकार आहे. मदतीचे वचन देतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.
Share your comments