कोरोना व्हायरसचा फटका कलिंगड उत्पादकांनाही बसत आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने खरेदीदार मिळत नसल्याचे चित्र सध्या बाजारांमध्ये दिसत आहे. खानदेशातील शिवार खरेदी ठप्प झाल्याने कलिंगड उत्पादकांना फटका बसला आहे. आता जळगाव, धुळे, शहादा, नंदुरबार या बाजारात लिलाव सुरू आहेत. या बाजारांमध्ये आवक वाढत असल्याने दर कमी मिळत आहे.
कलिंगडाला एकरी उत्पादनासाठी किमान ३० ते ३५ हजार रुपये खर्च लागला आहे. कलिंगडची लागवड धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, जळगावमधील चोपडा, पाचोरा या भागात झाली आहे. साधारण अडीच हजार हेक्टरवर ही लागवड झाली आहे. मागील हंगामात शेतकऱ्यांना पाच ते सात रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना मिळाला होता. परंतु यंदा शिवार खरेदीच ठप्प आहे. राज्याबाहेरील खरेदीदार येत असतात. साधारण ९५ टक्के विक्री थेट जागेवर होत असते. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान मधून खरेदीदार येत असतात. पंरतु यावेळी परराज्यातील खरेदीदार आलेले नाहीत. यामुळे शिवार खरेदी बंद असल्याने बाजार समित्यांमध्ये कलिंगड विक्रीसाठी आणावे लागत आहे. त्याला अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती आहे. दर इतका कमी असतो की, त्यातून वाहतूक खर्चही निघत नाही.
Share your comments