मुंबई: दुष्काळाची झळ सुसह्य करण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पिण्याचे पाणी राखून ठेवून पाणी शिल्लक राहिल्यास ते पाणी परभणीला देण्यात येईल आणि त्यातही प्राधान्य चारा पिकासाठी असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना दिले.
परभणी जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अतिशय कमी पर्जन्यमान झाले असल्याने दुष्काळाची परिस्थिती ओढवली असून शेतकऱ्यांना रब्बी व खरीप पिकांसाठी पाणी उपलब्ध नाही. हे लक्षात घेत भीषण पाणीटंचाई असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरी, सेलू, मानवत व जिंतूर या तालुक्यांना डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत दुधना प्रकल्पातून दोन पाळ्यांमध्ये पाणी सोडण्यात यावे, असे निर्देश जलसंपदा विभागाचे सचिव यांना श्री. रावते यांनी दिले तसेच त्यासंदर्भातील आदेश आजच काढण्याच्या सूचना केल्या.
श्री. रावते यांच्या पाठपुराव्यामुळे परभणीच्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी लोअर दुधना प्रकल्पातून प्रत्येकी 5 लक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश तात्काळ निघणार आहेत. परभणी जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी कांताराव देशमुख यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार सदर पाण्याचा मोठा उपयोग परभणी जिल्ह्यातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि उन्हाळी भुईमूग या पिकांना होणार आहे. तसेच जनावरांना मोठ्या प्रमाणात चाराही उपलब्ध होणार आहे, असे श्री. रावते यांनी सांगितले.
Share your comments