पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानाचा पारा वाढू लागला आहे. आजपासून विदर्भ मराठवाड्यात उष्ण कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील मध्यवर्ती भागात तयार झालेल्या आम्फन चक्रीवादळाचा वेग वाढला आहे. या चक्रीवादळामुळे हवेतील आर्द्रता खेचून घेतली आहे. परिणामी अंदमानपर्यंत दाखल झालेल्या मॉन्सूनचा वेग थोडासा मंदावला आहे.
२१ मेपर्यंत हे चक्रीवादळ सक्रिय राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतरच मॉन्सूनच्या पुढील प्रवास सुरू होणार, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. रविवारी नैऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला. मात्र दोन ते तीन दिवसांपासून बंगालच्या उपसगारातील मध्यवर्ती भागात अम्फन चक्रीवादळ तयार होऊ लागले होते. सध्या हे चक्रीवादळ मध्यवर्ती भागापासून उत्तरेकडे सरकू लागले आहे.
या चक्रीवादळाचा वेग आता चांगलाच वाढला आहे. १८ ते २० मे च्या दरम्यान या चक्रीवादळाचा वेग ५५ ते ७५ वरुन आता ताशी १५५ ते १८५ किमीच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ओडिसाच्या पारदीप पासून ७८० तर पश्चिम बंगालच्या दिघा दक्षिणपूर्व भागापासून ९३० आणि खेपगुपारा पासून १०५० किमी अंतरावर समुद्रात आहे. या चक्रीवादळाचे रुपांतर अतीतीव्र चक्रीवादळामध्ये झाले आहे. यामुले २१ मे पर्यंत पूर्व किनारपट्टीसह केरळ, कर्नाटक, माहे, अंदमान आणि निकोबार बेटावर अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. सध्याही या भागात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. २१ मे नंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मॉन्सूनची पुढील वाटचाल सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Share your comments