मुंबई
राज्यात पावसाअभावी पिके संकटात सापडली आहेत. काही भागातील पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळी स्थिती उद्भवू नये म्हणून राज्य सरकारने दुष्काळ वॉर रुम करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील वॉर रुममध्ये ही रुम तयार करण्यात येणार आहे.
मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांची वॅार रुम आहे. त्या रुममध्ये दुष्काळ वॉर रुम तयार करण्यात येत आहे. या रुमचा आज (दि.२९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत.
दुष्काळाच्या छायेत सापडलेले जिल्हे, तालुके, गावे, वाड्या वस्त्या यावर या रुममधून लक्ष ठेवलं जाणार आहे. तसंच गाव, तालुके,जिल्हे, विभाग या वॅार रुमशी जोडले जाणार आहेत. या रुममधून दुष्काळी भागासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल
राज्यात यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्याचा बहुतांश भाग दुष्काळाच्या छायेत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सरकारने दुष्काळी स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वॉर रुम तयार करणाचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे राज्यातील पाणीसाठा आणि स्त्रोत यांच्या उपलब्धतेनुसार पाण्याचे आरक्षण केले जाणार आहे.
२०१५ साली वॅाररुमची स्थापना
राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये या वॅाररुमची स्थापना केली. या वॅार रुमच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग, पुण्यातील रिंग रोड किंवा विमानतळाची काम यासारख्या पन्नासहून अधिक प्रोजेक्टचा आढावा याच वॅार रुममधून मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पाहायला मिळाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ठाकरेंनी याचे नामांतर करून संकल्प कक्ष सुरू केला. आता सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा वॉर रुम हे नाव कायम ठेवण्यात आलं आहे.
Share your comments