नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात लावलेल्या कापूस पिकातून चांगले उत्पादन प्राप्त झाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी काकाच्या जीवावर चांगला मोठा पैसा उभा केला. कापसाचे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचा प्रयोग केला. कांद्याची लागवड केली त्यावेळी कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळत होता.
मात्र आता कांदा हार्वेस्टिंग च्या वेळी कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुरता भरडला जात आहे. जो कांदा काही दिवसांपूर्वी ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी काढत होता तोच कांदा आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
नांदेड जिल्ह्यात शेतकरी बांधवांनी कापसाच्या पऱ्हाट्या वावरा बाहेर फेकल्या आणि लागलीच कांदा लागवडीचा अभिनव उपक्रम हाती घेतला. शेतकरी बांधवांना त्यावेळी कांद्याला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याने कांद्याच्या पिकातून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा होती. कापसाच्या पिकातून चांगली कमाई झाली होती त्यामुळे शेतकरी बांधवांनी कांदा जोपासताना हजारोंचा अतिरिक्त खर्च केला.
मात्र आता कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. या हंगामात कांदासाठी पोषक वातावरण असल्याने कांदा बियाण्यातून चांगले कांद्याची रोपे देखील शेतकरी बांधवांना मिळाले. यामुळे कांद्याच्या क्षेत्रात यावर्षी वाढ नमूद करण्यात आली. कांदा लागवड केल्यानंतर कांदा पिकावर हवामान बदलामुळे वेगवेगळ्या रोगांचे सावट बघायला मिळाले होते यामुळे शेतकरी बांधवांनी पैशाची जुळवाजुळव करत महागड्या औषधांची फवारणी करून कांद्याचे पीक जोपासले.
रोगांच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी कांद्याच्या उत्पादनात देखील घट झाली आहे. साधारणता एकरी कांद्याचे उत्पादन दीडशे क्विंटलच्या आसपास बसते मात्र यावर्षी यामध्ये मोठी घट झाली असून एकरी उत्पादन केवळ 50 क्विंटलच्या आसपासच आहे. उत्पादनात घट झाली शिवाय आता कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे.
सध्या कांद्याला 650 ते 750 रुपये प्रति क्विंटल एवढाच नगण्य दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते कांदा जोपासण्यासाठी एकरी 40 हजार रुपये खर्च आला आहे यामुळे सध्या मिळत असलेल्या कांद्याच्या दरात उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य आहे. कांद्याच्या पिकातून शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च देखील वसूल झाला नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
Share your comments