नाशिक : यंदा कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. कांद्याचे दर हे लहरीप्रमाणे कमी जास्त होत आहेत. याचा फटका हि शेतकऱ्यांना बसत आहे. पण कांदा उत्पादक शेतकरी आता नव्या कारणांमुळे संकटात सापडला आहे.
सध्या राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीठ सुरु आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. आत्ता खरीप हंगामातील (Kharif Season) कांद्याच्या काडणीचे काम जोमात सुरु आहे. शिवाय लाल कांद्याचे मार्केटही टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन कांद्याची काढणी, छाटणी करणे ही कामे जोरात सुरु आहेत. मात्र,अचानक होत असलेल्या पावसामुळे काढलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पावसामुळे कांदा भिजल्याने नासण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी हीच परस्थिती ओढावलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा अवकाळी पावसाने हिरावला आहे.
सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही पडत आहे. परिणामी या काळात कांदा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अजूनही वातावरण ढगाळ असल्याने कांदा पिकावर मावा, करवा असे रोग पडू लागले आहेत. खरीप हंगामात कांद्याची लागवड होताच वातावरणामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना बुरशीनाशक फवारुन कांद्याची जोपासना करावी लागली होती. पुन्हा पीक जोमात असतानाच डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांद्याचे नुकसान झाले होते.
लागवडीपासून काढणीपर्यंत हे पीक धोक्यातच होते. आता कुठे काढणी आणि छाटणी करुन कांदा बाजारपेठत जात होता. मात्र, अंतिम टप्प्यातही संकटाने शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाही. बाजारात 2 हजार रुपये सरासरी दर असल्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन काढणी आणि छाटणी केली मात्र, शेतातच पसरणीला ठेवलेला कांदा पावसाने भिजला त्यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे. या कारणांमुळे शेतकरी एका नव्या संकटात सापडला आहे.
Share your comments