नवी दिल्ली: मुंबईत आज छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात मतदार जनजागृती महाअभियानाला प्रारंभ झाला. कमी मतदान होत असलेल्या महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. रिजनल आऊटरिच ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश), माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या कार्यालयाशी समन्वय साधून हे अभियान आयोजित केले आहे. कोणीही मतदार वंचित राहू नये अशी या अभियानाची संकल्पना आहे.
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक आर.एन.मिश्रा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आऊट रिच कम्युनिकेशन ब्युरोचे महासंचालक सत्येंद्र प्रकाश यांनी या अभियानाचे उद्घाटन केले. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मोबाईल व्हॅनला झेंडा दाखवून अभियानाचा प्रारंभ केला. ही व्हॅन महाराष्ट्राच्या विविध भागांमधे मतदान करण्याचे आवाहन करणारा संदेश घेऊन जाणार आहेत. यावेळी मतदार जागृती करणारे फुगे आकाशात सोडण्यात आले.
सीएसएमटी रेल्वे स्थानकात गीत आणि नाटक प्रभागाच्या कलाकारांनी अभियानाच्या संकल्पनेवर आधारीत लोक कला सादर केली. यावेळी उपस्थितांना अभियानाबाबत माहिती देतांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक डी.जे.नारायण म्हणाले की, मतदार जागृतीसाठी 10 मोबाईल व्हॅन्स, 1,200 हून अधिक ठिकाणांचा दौरा करतील. आगामी निवडणुकांमधे मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन त्यांनी केले.
या प्रतिकात्मक प्रारंभानंतर दक्षिण मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जळगाव, धुळे आणि कल्याण येथे 2 ते 28 एप्रिल 2019 दरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानादरम्यान गीत आणि नाटक प्रभागाचे कलाकार सादरीकरण करतील. मुंबईत 25 ते 28 एप्रिल 2019 हे चार दिवस ते कला सादर करतील.
या अभियानात पुढील विषयांवर माहिती दिली जाईल.
- PwD (दिव्यांग व्यक्ती) ॲप.
- cVigil ॲप.
- EVM आणि VVPAT चा वापर.
- मतदार ओळखपत्रासाठी 10 पर्याय, जे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी वापरता येतील.
Share your comments