मुंबई
राज्यातील रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार याबाबतचा निर्णय काँग्रेस दिल्ली हायकमांडकडे रखडला होता. त्यामुळे निवड करण्यात दिरंगाई झाली होती. अखेर हायकमांडने निर्णय घेत विजय वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी दिली आहे. तर विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच असणार आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार यांनी बंड केले. त्यानंतर अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. त्यानंतर राज्यात बहुमत असलेल्या पक्ष काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदी दावा केला होता.
अधिवेशन सुरु असताना सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड झालेली नव्हती. त्यामुळे काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्याकडे दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. याआधी २०१९ मध्ये वडेट्टीवार यांच्याकडे हे पद देण्यात आलं होतं.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्यावर हाय कमांडने विश्वास दाखवल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. काँग्रेस पक्षामध्ये माजी मुख्यंत्री अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आताचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ही जबाबदारी जाईल असं बोललं जात होतं. मात्र वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे.
Share your comments