१) कमी पावसाचा शेतमाल उत्पन्नावर परिणाम
यंदा राज्यातील खरीप हंगाम चांगला येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी होती. तसच हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात चांगला पाऊस झाला नाही. राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांत अपेक्षित मोसमी पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम शेतमालाच्या उत्पन्नावर होणार आहे. खरीप हंगमात उत्पादन मोठया प्रमाणात घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील ८९० मंडळात खरीप पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.
२)बहुतांश भागातून मान्सूनची माघार
देशातून मान्सून परतीचा प्रवास सुरु असल्यामुळे काही भागात पावसाची हजेरी सुरु आहे. गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. मान्सूनची माघार झाल्यामुळे ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. तर हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर भागात पुढील २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
३) उजनीतील पाणी आवक मंदावली
उजनी धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे सध्या उजनी धरणात ६० टक्के पाणीसाठा आहे. पुणे जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे धरणातील अतिरिक्त पाणी उजनी धरणाकडे सोडण्यात येत होते. पुणे जिल्ह्यातून जवळपास ४० ते ५० हजार क्युसेकपर्यंत पाणी उजनी धरणाकडे सोडण्यात येत होते. मात्र, पाऊस थांबल्यानंतर विसर्गातही टप्प्याटप्प्याने घट झाली.
४) विदर्भातील सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव
विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.जवळपास ७० टक्क्यांपेक्षा अधिक सोयाबीन खराब झाले आहे. मोझॅक रोगामुळे सोयाबीनमध्ये दाने देखील भरले नाहीत. त्यामुळे उत्पादन कमी येण्याची शक्यता आहे. तसंच अनेक शेतकऱ्यांनी केलेला उत्पादन खर्च देखील यंदा निघण्याची शक्यता नाही. यामुळे सोयाबीन उत्पादकांकडून आता मदतीची मागणी होऊ लागली आहे.
५) अग्रीम विमा लवकर मिळण्याची शक्यता
राज्यातील पात्र शेतकऱ्यांना अग्रीम घटकातील विमा भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी मिळण्याची शक्यता आहे. विमा कंपन्यांना यंदा राज्याकडून पावणेपाच हजार कोटी रुपयांच्या आसपास विमा हप्ता दिला जाणार आहे. राज्य शासन, केंद्र शासन व शेतकरी हिस्सा अशा तीन घटकांकडून विमा हप्ता मिळाल्यानंतर विमा कंपन्यांकडून भरपाईचे अंतिम दावे निकाली काढले जातात. याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील काही दिवसांपूर्वी आदेश दिले आहेत.
Share your comments