गांडूळाला शेतकऱ्यांचा मित्र असे म्हटले जाते. याला कारण देखील तसेच आहे. गांडूळ जमिनीची निगा राखून जमिनीत खत निर्माण करण्याचे काम करते. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होते. अँरिस्टाँटल या ग्रीक शास्तज्ञाने प्रथम गांडूळाचे जमिनीतील कार्य ऒळखले, त्यानी गांडूळांना पुथ्वीची आतडी असे म्हटले आहे. डार्विन या शाश्रज्ञाच्या मताप्रमाणे गाडूळ जमिनीतील मेलेल्या प्राण्यांचे, वनस्पतीचे, काडी कचऱ्याचे विघटन करून जमिनीची संरचना सुधारून जमीन सुपिक करतात. गांडूळामुळे जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते.
गांडूळ हा उभयलिंग प्राणी आहे. अंडावस्था, बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि प्रौढावस्था अशा चार जीवन क्रमाच्या अवस्था आहेत. अंडावस्था ३ ते ४ आठवडे, बाल्यावस्था व तारुण्यावस्था ४-१० आठवडे तर प्रौढावस्था ६-२४ महिन्यांपर्यंत आढळते. प्रयोगशाळेतील अभ्यायासानुसार गांडूळाचे आयुष्य १५ वर्षे असते. परंतु निसर्गामध्ये गांडूळाचे कोंबड्या, गोम, पक्षी, रानडुकरे, मुंगूस इत्यादी शत्रू असतात. तारुण्य अवस्थेमध्ये २ गांडूळे एकत्र आल्यानंतर दोन्ही गांडूळे एक कोष (ककून) टाकतात. या कोषात १८ ते २० अंडी असतात. प्रत्येक कोषातून ३ ते ४ गांडूळे बाहेर पडतात. याप्रमाणे गांडूळांची एक जोडी ६ ते ८ पिल्लांना जन्म देते. एक गांडूळ दर ७ ते ८ दिवसांनी एक कोष देते. एक कोष होवून पिल्ले बाहेर येण्यास १४ ते २१ दिवस लागतात. एका वर्षात गांडूळे १ ते ६ पिढ्या तयार करतात. त्यांचाजीवनचक्राचा कालावधी जातीनुसार व हवामानानुसार बदलत असतो.
छपरामध्ये दोन फूट रुंदीचा मधोमध रस्ता सोडून त्यांच्या दोन्ही बाजूने तीन फूट रुंदीच्या दोन ओळी ठेवा. त्या दोन ओळीवर उसाचे पाचट, केळीचा पाला किंवा इतर काडीकचरा यांचे तुकडे करून सहा इंच उंचीचा थर द्यावा. त्यामुळे गांडूळांना जाड कचऱ्यात आश्रय मळेल. दुसरा थर चांगल्या मुरलेल्या, रापलेल्या खताचा किंवा सुकलेल्या स्लरीचा द्यावा. बीजरूप म्हणून या थरावर साधारण ३ x ४० फूटासाठी १० हजार गांडूळे समान पसरावीत. त्यावर कच-याचा १ फूट जाडीचा थर घालावा. पोत्याने / गोणपाटाने सर्व झाकून ठेवावे.
शेणखतामध्ये गांडूळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळ खत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडी खत, घोड्याची लिद यापासूनसुध्दा खत तयार होते. गांडूळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत व सेंद्रिय खत यांचे प्रमाण अर्धे अर्धे वापरुन गांडूळ खत तयार करता येते. गांडूळ खाद्यामध्ये शेतातील ओला पालापाचोळा, भाजीपाल्यांचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांचे अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड यांचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळासाठी वापरताना त्यामध्ये १:३ या प्रमाणात शेणखत मीसळणे आवश्यक आहे. गांडूळखाद्य नेहमी बारीक करून टाकावे, बायोगॅस प्लांटमधून निघालेली स्लरीसुद्धा गांडूळ खाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्यामध्ये गांडुळे टाकण्या अगोदर गांडूळ खाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे. म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल.
गांडूळांच्या संवर्धणासाठी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.
१. एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त २००० गांडूळे असावीत.
२. बेडूक, उंदीर, घूस, मुंग्या, गोम या शत्रूंपासून गांडूळाचे संरक्षण करावे.
३. संवर्धक खोलीतील खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान २० अंश ते ३० अंश से. या दरम्यान ठेवावे.
गादीवाफ्यावर सरळ सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.
४. गादीवाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वाफ्यातील ओलावा ४० ते ४५ टक्के ठेवावा.
५. गांडूळे हाताळतांना किंवा गांडूळ खत वेगळे करताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. इजा झालेली गांडूळे वेगळी करावीत, जेणेकरुन इतर गांडूळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.
Share your comments