गेल्या काही दिवसांपासून वातावरतात सारखेच बदल होत आहेत. या बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीठ याचा भाजीपाला पिकांवर खूप परिणाम झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. भाजीपाल्याची आवक कमी असल्यामुळे भाजीपाला दरात तेजी आली आहे.
जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१८) गवार, वांगी व हिरव्या मिरचीची आवक कमी झाली. दरात मात्र तेजी पाहायला मिळाली. बटाट्यासह पालक, मेथी, शेपू व पुदिनाचे शेकडा दर स्थिर राहिले. तर टोमॅटोचे दर तुलनेने कमी राहिले आहेत.
वांगी, गवार, हिरवी मिरची तेजीत
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी गवारीची आवक ४ क्विंटल, तर दर ४००० ते ५५०० रुपये, तर सरासरी ५००० रुपये राहिले. वांग्यांची १३ क्विंटल आवक झाली. त्यांना ५००० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी ६००० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक २२ क्विंटल, तर दर ३००० ते ५५०० रुपये व सरासरी ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिला.
२० क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी ७०० रुपये दर मिळाला. फ्लॉवरची आवक २५ क्विंटल, तर सरासरी दर २४०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. वाटाण्याची आवक १२ क्विंटल, तर सरासरी दर २५०० रुपये राहिला. भेंडीची आवक ७ क्विंटल, तर सरासरी दर ३५०० रुपये राहिला. गाजराचे सरासरी दर १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
१०० रुपये प्रतिशेकड्याचा दर
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर १५०० जुड्या, मेथी २००० जुड्या, पालक १००० जुड्या, तर शेपूचीही १००० जुड्यांची आवक झाली. या सर्व पालेभाज्यांना सरासरी १०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. दहा क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे सरासरी दर १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ४ क्विंटल आवक झालेल्या दोडक्यांना सरासरी २००० रुपये दर मिळाला.
Share your comments