मार्च महिन्यापासून देशात लोकडाऊन सुरू होते, दरम्यान मागील दोन महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सगळे व्यवहार चालू करण्यात येत आहेत. परंतु मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शेतात पाणी तुंबल्याने बहुतांश पिके सडून खराब झाले आहेत. त्याला भाजीपालाही अपवाद नाही. याचमुळे बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी लावलेल्या भाजीपाला अतिपावसाने खराब झाला. त्यामुळे राज्यातील बहुसंख्य बाजार समित्यांमधील भाजी मार्केटमध्ये आवश्यक त्या प्रमाणात पालेभाज्या व इतर भाजीपाला वर्गीय पिकांची मागणी वाढली आहे, पण कमी आवक होत आहे.
त्याचा परिणाम थेट भाजीपाल्यांच्या भाव वाढीवर झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाल्याचे दर परवडत नाहीत. मुंबईतील दादर, वाशी मार्केटमध्ये अत्यंत कमी भाजीपाल्याची आवक झाली असून बहुतेक सर्व भाज्यांचे भाव कडाडले आहेत. दादर भाजीपाला मार्केटमध्ये दीडशे ते दोनशे टेम्पो भाजीपाला आवक होत असते, परंतु सध्या ६० ते ७० टेम्पो आवक होत आहे, म्हणून भाजीपाला विक्रेत्यांना चढ्या भावाने भाजी विकणे जिकिरीचे होत आहे. दादर मार्केट जर विचार केला तर, मेथी जुडी ४० ते ५० रुपये, टोमॅटो ८० रुपये प्रतिकिलो, भेंडी ८० रुपये किलो, शेवगा शंभर रुपये किलो अशारीतीने भाज्यांचे भाव कडाडले आहेत. पावसामुळे अजून काही दिवस तरी भाजीपाल्याचा पुरवठा हा मागणीच्या मानाने सुरळीतपणे होणे दुरापास्त दिसत आहे.
Share your comments