Vaidyanath Cooperative Sugar Factory :
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परळी येथिल वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने १९ कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्यामुळे केंद्रीय जीएसटी (GST) आयुक्तालयाने कारखान्याच्या गेटवर जप्तीची लावली आहे. तसंच याबाबत चौकशी देखील होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या या कारखान्याला नोटीस बजावली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात आणि बीडमध्ये राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर एप्रिल महिन्यात जीएसटी विभागाने छापा टाकला होता. त्यावेळी अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती. त्यातून कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याचे स्पष्ट झाले होते. केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशी सुरु होती. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला शनिवारी यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती.
राज्यात आत्तापर्यंत भाजपविरोधी नेत्यांवर आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्यात येत होती. सीबीआय ईडीची कारवाई सुरु असतानाच आता भाजप नेत्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण आता पुन्हा एकदा जीएसटी विभागाने पंकजा मुंडे यांना धक्का दिला आहे.
दरम्यान, याआधीही युनियन बँकेने कारखान्याची मालमत्ता सील केली आहे. युनियन बँकेचे कारखान्यावर १ हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज न फेडल्याने बँकेने ही कारवाई केली आहे. त्यात आता पुन्हा जीएसटी विभागाने बँकेची ही कारवाई ताजी असतानाच आता जीएसटी कार्यालय अधिक सक्रिय झाल्याने कारखान्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
Share your comments