आजचे युग हे माहितीचे युग असुन आपणास उपयुक्त माहितीचे ज्ञान अवगत करणे गरजेच आहे. देश-विदेशातील कृषि संशोधनाच्या माहितीसाठी कृषि संशोधक व प्राध्यापकांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी भारतीय कृषि संशोधन परिषदेने निर्माण केलेल्या सेरा या सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर वाढवावा, असा सल्ला कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यापीठ ग्रंथालय व परभणी कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 सप्टेबर रोजी ‘कॉन्सोरशियम ऑफ ई-रिसोर्स इन अॅग्रीकल्चर’ सेरा सॉफ्टवेअर प्रणालीबाबत प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, पुणे येथील इन्फॉर्ममेटिक्सचे तज्ञ श्री. मयंक डेधिया, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. संतोष कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील यांनी मार्गदर्शनात विद्यापीठ ग्रंथालय पुर्णपणे डिजिटल झाले असुन एका क्लीकवर विविध शोध प्रबंध व शोध निबंध उपलब्ध असल्याचे सांगितले. कार्यशाळेत इन्फॉर्ममेटिक्सचे तज्ञ श्री मयंक डेधिया यांनी ‘कॉन्सोरशियम ऑफ ई रिसोर्स इन अॅग्रीकल्चर’ सेरा सॉफ्टवेअर प्रणालीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संतोष कदम यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. रणजित चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.
Share your comments