AI Farming
पुणे : आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक करणे ही काळाची गरज आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात ‘एआय’च्या वापरासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर शेतीला थेट फायदा होईल. ऊसाच्या शेतीतसह इतरही पीकांकरीता ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या, महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांना अभिवादन करुन संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात योगदान दिलेल्या महाराष्ट्रवीरांच्या त्यागाला वंदन करतानाच त्यांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
विकसित भारत, विकसित महाराष्ट्र…
देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असलेल्या महाराष्ट्राचा देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात (जीडीपी) साडे तेरा टक्के इतका वाटा आहे. या पार्श्वभूमीवर, विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2025-26 या आर्थिक वर्षाचा सात लाख वीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पूर्वानुभवाच्या बळावर राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करण्याचा कसोशीचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
‘कृषी हॅकेथॉन’चे नवे पाऊल…
कृषी हॅकेथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, संस्थांच्या मदतीने शासनस्तरावर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवकल्पक संशोधकांना संधी मिळणार आहे. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल.
Share your comments