कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन गारवा घटला असून, त्यामुळेच आज राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
हवामान विभागाने यापूर्वीच अशाप्रकारे अवकाळी पाऊस राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात होणार असल्याचा इशारा दिला होता. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा अंदाज आज खरा ठरला.
मुंबई, मुंबई-उपनगरे, पुणे, नाशिक, जालनासहीत मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी गाराही पडल्याचे वृत्त आहे. मुंबई उपनगरांमधील नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबवलीसहीत अंबरनाथमध्येही मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला.
या अवकाळी पावसामुळे अंब्याच्या पिकाबरोबरच अनेक जिल्ह्यांमधील शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. ज्वारी, गहू, हरभरा, या पिकांसह आंबा व झेंडुचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने चार द्राक्ष बागा कोसळून सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.
सातारा, कोल्हापूर, जिल्ह्यातही ज्वारी, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून ज्वारी व कडबा काळा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मराठावाड्यातील काही भागात गारांसह जोरदार पाऊस झाला. रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात देवठाणा , कांदेवाडीसह इतर गावात पाऊस झाला.सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळ सदृष्य परिस्थिती निर्माण झालीय. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यामुळे गारपीट झाली असून उद्याही पाऊस आणि गारपीट सुरु राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
स्कायमेट या खासगी हवामानशाळेचे उपाध्यक्ष महेश पळवट यांनी यासंदर्भातील ट्विट केले आहे.
Share your comments