गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अगदी हातातोंडाला आलेली पिके पूर्णपणे उध्वस्त झाली. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याचा सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी गारपीट व अतिवृष्टी झाली. अवकाळी पाऊस व गारपिटीने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.
यामुळे या नुकसानाची दखल घेत राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांनी मात्र तत्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. यामध्ये कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गोंडपिपरी, जिवती, कोरपना, पोंभुर्णा, मूल, भद्रावती, वरोरा, राजुरा, नागभीड व ब्रह्मपुरी या तालुक्यांत अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले.
असे असताना काही ठिकाणी पावसाचे पाणी घरात घुसल्याने घरांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांचे नुकसान झाल्याने नागरिकांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येणार असून प्रशासनाकडून योग्य ती मदत दिली जाईल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्य आणि केंद्र सरकारने पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना याबाबत दिलासा देण्याचा प्रयत्न करावा असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात १० व ११ जानेवारीला वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार काळजी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांचे गारपीटीमध्ये मोठे नुकसान झाले, यामुळे कर्जबाजारी असलेला शेतकरी अजूनच कर्जबाजारी होणार आहे. अनेक शेतकऱ्याची शेतातील कामे यामुळे रखडली आहेत. यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या अनेक नेत्याचे दौरे देखील नुकसानग्रस्त भागात सुरु झाले आहेत.
Share your comments