आनंद ढोणे
Parbhani News : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा पावसाचा परभणी जिल्ह्याला देखील मोठा फटका बसला आहे. परभणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने फळ पिकांचे आणि रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्त शेतकरी आता मदतीची मागणी करत आहेत.
अवकाळीमुळे रब्बीतील ज्वारी हरबरा,भाजीपाला, कापूस, तूर, ऊस आणि विविध फळबांगाचे नुकसान झाले आहे. तसंच वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने फळ झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही भागातील जमिनी देखील खरडून गेल्या आहेत.
पूर्णा तालूक्यातील फुकटगाव येथील शेतकरी हनुमान सोपानराव बोकारे यांची अडीच एकर पेरु बागेचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. तसेच फळांची गळती झाल्याने देखील त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या नुकसानग्रस्त भागाची गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी पाहणी केली आहे. तसंच नुकसानग्रस्त फळबागेची देखील पाहणी करून शासन स्तरावरुन मदत मिळवून दिली जाईल अशी ग्वाही शेतकऱ्याला दिली आहे. परभणी जिल्ह्यात अवकाळीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याने त्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जात आहे.
Share your comments