संशोधन हे अव्याहत चालणारी प्रक्रिया असुन शेतीतील समस्यांनुसार कृषी संशोधनाची दिशा निश्चित होत असते. जागतिक व देशातील बाजारपेठेत सेंद्रीय शेतमालाची मागणी वाढत असुन एकात्मिक शेती पध्दती बरोबरच संशोधनाच्या आधारे सेंद्रीय शेती पध्दतीस चालना देण्यास विद्यापीठ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने सेंद्रीय शेती विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असुन या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी (दिनांक 28 डिसेंबर रोजी) ते बोलत होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण तज्ञ डॉ. प्रशांत नाईकवाडी, अभिनव फार्मर क्लबचे संस्थापक तथा सेंद्रीय शेती तज्ञ श्री. ज्ञानेश्वर बोडके, केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले की, सेंद्रीय शेतमालास प्रमाणीकरण केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. सेंद्रीय शेतीत लागणाऱ्या निविष्ठा बाजारातुन विकत घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वत: घरच्या घरी तयार कराव्यात किंवा शेतकरी गटांच्या माध्यमातुन निर्मिती कराव्यात, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल. सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव विद्यापीठात सुरू असलेल्या सेंद्रीय शेती संशोधनास उपयुक्त ठरू शकतात. विद्यापीठात संशोधनाच्या आधारे एक आदर्श सेंद्रीय शेतीचे मॉडेल तयार करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आपल्या भाषणात म्हणाले की, शेतमालातील रासायनिक घटकांमुळे मानवाच्या आरोग्य प्रश्न निर्माण होत आहेत, विषमुक्त शेतमाल निर्मिती करून बाजारपेठेत सेंद्रीय मालाबाबत विश्वासहर्ता निर्माण करावी लागेल. एप्रिल 2018 पासुन विद्यापीठात सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राची सुरूवात झाली असुन वेळोवेळी सेंद्रीय शेती, प्रमाणीकरण व बाजारपेठ याबाबत शेतकऱ्यांना या केंद्राच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येईल.
श्री. ज्ञानेश्वर बोडके आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, बाजारपेठेत सेंद्रीय शेतीमालातुन जास्त नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना थेट विक्रीशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांनी स्वत: शेतमालाची प्रतवारी करून घरपोच व थेट विक्री केल्यास निश्चितच चांगला बाजारभाव मिळेल. यासाठी मोबाईल एपचाही चांगला उपयोग होऊ शकेल. कार्यक्रमात डॉ. प्रशांत नाईकवाडी व डॉ. शंशाक शोभणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ. विक्रम घोळवे यांनी मानले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्रगतशील शेतकरी सोपानराव अवचार, माणिक रासवे, ज्ञानोबा पारधे, नरेश शिंदे, संतोष मोरे, आदीसह परभणी जिल्हयातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
Share your comments