गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीत वाढ करणारी बातमी समोर येत आहे. जिल्ह्याच्या खेड एपीएमसीमध्ये कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाल्याचे नमूद करण्यात आले. बुधवारी खेडी एपीएमसीमध्ये कांद्याच्या दरात क्विंटल मागे 600 रुपयांची घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे, यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊ शकते असे सांगितलं जातं आहे.
बुधवारी खेड एपीएमसीमध्ये सुमारे 15 हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याचे बाजार समितीद्वारे सांगितले गेले. या दिवशी कांद्याला 1000 रुपये पासून ते 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला. कांद्याच्या दरात होत असलेल्या घासरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या तसेच कांदा व्यापाऱ्यांच्या मते, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कांदा निर्यातीसाठी मोठ्या अडचणी येत आहेत आणि म्हणूनच कांदा बाजारभावात मोठी पडझड झाली असल्याचे सांगितले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र कांद्याच्या बाजारभावात कमालीची स्थिरता बघायला मिळाली होती, मात्र रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अचानक कांद्याच्या बाजारभावात कमालीची घसरण झाली आणि त्यामुळे राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धाकधूक वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा रोष देखील व्यक्त केला आहे.
खेड एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या चाकण बाजार समितीच्या आवारात सध्या गावरान कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे, बाजारपेठेत दाखल होणारा गावरान कांदा हा निर्यातक्षम आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचा कमीत कमी दर 1500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता तर जास्तीत जास्त 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा होता, हाच दर दोन महिने कायम राहिला तेव्हा देखील मिळत असलेला दर शेतकऱ्यांच्या अपेक्षएवढा नव्हता मात्र त्या दरात उत्पादन खर्च वजा जाता चार पैसे शेतकऱ्यांच्या पदरी पडत होते. मात्र आता बुधवारी खेड एपीएमसीमध्ये अचानक क्विंटलमागे 500 रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून मोठा संताप शेतकऱ्याद्वारे व्यक्त केला जात आहे.
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या दरात पडझड होत असल्याचे मत खेड एपीएमसी मधील काही बड्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. व्यापाऱ्यांच्या मते कांद्याची निर्यात ही कंटेनर मार्फत केली जाते मात्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीसाठी आवश्यक कंटेनर उपलब्ध होत नसल्याने आणि जर युद्धामुळे कुठे कंटेनर अडकले तर संपूर्ण कंटेनर मधील कांद्याची नासाडी होण्याचा धोका असल्याने कांदा निर्यात सध्या कोलमडली आहे. व्यापाऱ्यांच्या मते यासाठी केंद्र सरकारने एक भरीव धोरण आखणे अनिवार्य आहे.
Share your comments