Ujani Dam Water Stock : यंदा सोलापूर, नगर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या धरणात अवघे ९ टक्के पाणी आहे. सध्या उजनी धरणातून सोलापूर महापालिकेसह पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा नगरपालिकेला पिण्यासाठी ५ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे.
गतवर्षी जानेवारी महिन्यात धरणात १०० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी हाच पाणीसाठा फक्त १० टक्केच्या आत आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सोलापूरची तहान भागवण्यासाठी धरणातून ५ टीएमसी पाणी सोडावे लागते. हे पाणी सोलापूरकरांना केवळ ५० दिवस पुरणार असल्याने पुढे सोलापूर करांना पाणी कायम द्यावे लागणार आहे. यामुळे प्रशासनाची आता पासून पाणी व्यवस्थापनाबाबत चिंता निर्माण झाली आहे.
अलनिनोचा पावसावर परिणाम
मागील वर्षी राज्यात अलनिनोमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. यामुळे धरणांत चांगला पाणीसाठा झाला नाही. यावर्षी देखील सुपर अलनिनोचा फटका बसल्यास त्याचा परिणाम पावसावर होईल. आणि जुलै मध्येही पाण्याचे रोटेशन सोडावे लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात मृत साठ्यातून पाणी सोडण्याची वेळ येणार आहे.
यंदा पावसाने देशभरात पाठ फिरवली असल्याने सर्वत्र पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने धरणात एक ते दीड टीएमसी पाणी वाढल्याने प्रशानाला काहीसा दिलासा मिळाला आहे. आता उजनी धरणातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. हे आवर्तन सोडले असता धरणातील पाणीपातळी ४ दिवसांतच उणेत जाण्याची शक्यता आहे.
धरणात ६८ टीएमसी पाणीसाठा
सध्या उजनी धरणात ६८ टीमएसी पाणी आहे. मात्र यात जिवंत पाणीसाठा फक्त पावणेपाच टीमसी साठा शिल्लक आहे. त्यानंतर मृत पाणीसाठा वापरण्यास सुरुवात करावी लागणार आहे. याच दरम्यान रब्बीसाठी दुसरे आवर्तन देण्याचा निर्णय झाल्यास आणखी ६ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे २० जानेवारीलाच उजनी धरण मायनस मध्ये जाण्याची शक्यता आहे.
पाणीसाठा किती आणि कसा?
गेल्यावर्षी उजनी धरणात जानेवारी महिन्यात एकूण पाणीसाठा ११८.०७ टीएमसी होता. तोच साठा यंदा ६८.४८ टीएमसी आहे. गतवर्षी जानेवारीत जिवंत पाणीसाठा ५४.४१ टीमएसी होता. यंदा ४.८२ टीएमसी आहे. मृतसाठा ६४ टीएमसी तर यंदाही ६४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
Share your comments