मुंबई
सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्फोटक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टिझर आज (दि.२५) सोशल मिडीयावर प्रकाशित करण्यात आला आहे. या टिझर मधून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
'आवाज कुणाचा' या शो ने संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. २६ जुलैला या स्फोटक मुलाखतीचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहेत तर २७ जुलै रोजी दुसरा भाग येणार आहे. त्यामुळे या मुलाखतीकडे सर्व राज्याचे लक्ष लागलं आहे. तसंच संजय राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तरे दिली आहेत.
मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी तुमच्या नेतृत्वाखालचं सरकार वाहून गेलं…,असा सवाल विचारला आहे. त्यावर सरकार वाहून गेलं नाही. तर खेकड्यांनी ते पोखरलं, असं उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. या टीकेला आता गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
टिकेला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्हाला खेकडा म्हणता तर म्हणा. पण लक्षात ठेवा खेकडाच कावीळवर योग्य पर्याय ठरतो. या खेकड्यांना जपलं असतं तर शिवसेना फुटली नसती, असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला आहे.
दरम्यान, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाताय ही चांगली बाब आहे. आम्हाला एक कळत नाही आमचा दोष काय होता? आता कोण कुठे जाऊन मुजरा करतो हे पाहावं लागेल. तुम्ही दिल्लीत जाऊन राम राम करायचा तेव्हा काय?, असा प्रतिसवालही गुलाबराव पाटलांनी ठाकरेंना केला आहे.
Share your comments