1. बातम्या

बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण कारागिरांसह आदिवासी समुदाय समृद्ध होईल

पुणे: वृक्षारोपण, वन्यजीवांचे संरक्षण आणि आदिवासी समाजाचे सशक्तीकरण करण्यावर राज्याच्या वनविभागाचा भर असून वनविभागाचे काम गतिमान आहे. बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण कारागीरांसह आदिवासी समुदाय आर्थिकदृष्ट्या समृध्द होईल, असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.

KJ Staff
KJ Staff


पुणे:
वृक्षारोपण, वन्यजीवांचे संरक्षण आणि आदिवासी समाजाचे सशक्तीकरण करण्यावर राज्याच्या वनविभागाचा भर असून वनविभागाचे काम गतिमान आहे. बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण कारागीरांसह आदिवासी समुदाय आर्थिकदृष्ट्या समृध्द होईल, असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.

येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बांबू हस्तकला व कला केंद्र आणि ग्रंथालय इमारतीच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राज्यपाल श्री. राव बोलत होते. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, वन विभागाचे सचिव विकास खारगे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमळकर, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले, आज राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे बांबू हस्तशिल्प आणि कला केंद्राचे उद्धघाटन करण्यात आले या माध्यमातून आदिवासी समाजाला आर्थिक उन्नत करण्यासाठी मदत होईल. बांबूत रोजगार निर्मिती करून आदिवासी समुदायांना समृद्ध करण्याची प्रचंड आर्थिक क्षमता आहे. बांबूपासून तयार करण्यात येत असलेल्या राखी, स्वयंपाकघर, बास्केट, चटई, फर्निचर, बांबू घरे यांना देशासह परदेशातही मोठी मागणी वाढत आहे. या माध्यमातून नवा आर्थिक स्त्रोत निर्माण होणार आहे. या क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पना प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अग्रेसर असून मानव संसाधन विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या दहा क्रमांकात पुणे विद्यापीठाचे नाव आहे. विद्यापीठाचे काम अत्यंत उत्कृष्टपणे सुरू असल्याचे राज्यपाल श्री.राव म्हणाले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील तीन विद्यापीठात बांबू प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या राज्यपालांच्या सूचनांचे आम्ही तातडीने पालन केले. बांबू हा खऱ्या अर्थाने कल्परूक्ष असून सामान्य माणसाला समृध्द करण्याची यामध्ये ताकद आहे. या क्षेत्रात रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी या क्षेत्रात कौशल्यवृध्दी करणे आवश्यक असून त्यादृष्टीने राज्य सरकार आणखी प्रयत्न करत आहे. ही प्रशिक्षण केंद्रांचे परिवर्तन रोजगार निर्मिती केंद्रात करण्यासाठी इंटरनॅशनल ऑनलाईन बाजारपेठ राज्य सरकारने उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पुणे बरोबरच अमरावती व राहुरी विद्यापीठातील बांबू हस्तकला व कला केंद्राचे राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तसेच राज्यपालांच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठ, अमरावती व राहुरी विद्यापीठांबरोबर बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राशी सामंजस्य करारांचे आदान-प्रदान करण्यात आले. यावेळी प्रशिक्षण केंद्रातून यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल अंकिता सांबरे, वैशाली दांडेकर, संजना सांबरे यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सुरूवातीला बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्यावतीने मांडण्यात आलेल्या बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाची राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पाहणी केली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू नितीन करमळकर यांनी केले. तर आभार प्रभारी कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी मानले. यावेळी वनविभागचे सचिव विकास खारगे यांचे भाषण झाले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र नागपूरचे संचालक राहूल पाटील, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.

English Summary: Tribal communities including rural artisans will be rich through bamboo handicrafts center Published on: 05 October 2018, 09:39 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters