1. बातम्या

जिवाची पर्वा न करता वृक्षप्रेमी अभिनेत्याने विझवला वणवा

KJ Staff
KJ Staff


पुणे
अनेक बॉलीवूड अभिनेते आणि मराठी कलाकार ही सामजिक कार्य करत असतात. सामजिक कार्य करण्यासाठी अनेक अभिनेत्यांच्या संस्थाही असतात. अशाच एका अभिनेत्याविषयी आम्ही बोलत आहोत. ते माणसांपेक्षा अधिक वृक्षांवर प्रेम करतात. त्याच्या मते वृक्ष आपल्याला निस्वार्थपणे सर्वकाही देत असतात. परंतु मनुष्य हे स्वार्थ ठेवून आपली मदत करत असतात. या वृक्षप्रेमी अभिनेत्याने अनेक वृक्षाची लागवड केली आहे, अशा वृक्षप्रेमी अभिनेत्याचे नाव आहे सयाजी शिंदे.

वृक्षाविषयी त्यांना किती जिव्हाळा आणि किती प्रेम आहे याची प्रचिती काल परत झाली. काल पुण्याच्या कात्रज घाटात वणवा लागल्याची घटना घडली होती. अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांचे मित्र कात्रजच्या घाटातून प्रवास करत होते. वणवा लागल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वणव्याकडे धाव घेतली. त्याच्यासोबत त्यांचे मित्र नगरसेवक राजाभाऊ बराटे आणि इतर चार-पाच मित्र होते. काही वेळानंतर त्यांना आग विझविण्यात यश आले. सयाजी शिंदे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नागरिकांकडून सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्रांचे कौतुक होत आहे. सयाजी शिंदे हे राज्यात नेहमी वृक्षारोपणाचे विविध कार्यक्रम राबवत असतात. इतकेच नाही तर त्यांनी ट्री फांउडेशन नावाची संस्थाही सुरु केली आहे. यातून ते वृक्षप्रेमींना एकत्र करत वृक्षरोपणाची कामे करत असतात. सयाजी शिंदे यांनी आपल्या मोहिमेत विद्यार्थ्यांनाही जोडले आहे. राज्यातील १९ ठिकाणी त्यांनी वृक्षरोपणाची कामे केली आहेत.

भाजप सरकारवर केली होती टीका -

भाजप सरकारमधील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात वृक्षरोपणचे आंदोलन छेडले होते. या अभियानातून त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी वृक्षरोपण केल्याचा दावा केला होता. राज्यात ३३ कोटी वृक्षरोपण झाल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला होता. परंतु सरकारचे हे वृक्षरोपण म्हणजे नाटक असल्याची टीका अभिनेते सयाजी शिंदे यांनी केली होती. आपण अनेक ठिकाणी वृक्षरोपण केले पण त्याचे कधी व्हिडिओ शुटिंग करत नाहीत, असे त्यांनी आपल्या अनेक मुलाखतीत म्हटले आहे.

वृक्ष संमेलनाचे आयोजन

संमेलन हा शब्द ऐकला की, आपल्यासमोर चित्र उभे राहते ते साहित्य संमेलनाचे, त्यातील तामझाम अगदी सगळं. पण अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षांचे संमेलन आयोजित केले. सयाजी शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात बीड येथे वृक्ष संमेलन आयोजित केले होते. या संमेलनात वृक्ष रोपांची दिंडी काढली होती. त्यात वडाच्या वृक्षाला अध्यक्ष बनवण्यात आले होते अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. पालवनच्या देवराई प्रकल्पावर पहिले वृक्ष संमेलन झाले. या संमेलनात अनेक पर्यावरण प्रेमींनी आपला सहभाग नोंदवला होता.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters