मुंबई: ‘शेतकरी देशाचा प्रमुख घटक आहे. त्यामुळे त्याच्या जीवनमानात बदल घडविण्यासाठी, त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापार आणि उद्योग क्षेत्राने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शेतमाल वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी सर्वंकष असे धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न व्हावा,’ अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे व्यक्त केली.
मालवाहतूक क्षेत्राशी निगडीत 'कोल्ड चेन' या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी शीत साखळी वाहतूक (सप्लाय चेन मॅनेजमेंट) क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध कंपन्यांना राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने 'असोचॅम' आणि ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन ऑफ इंडिया-टीसीआय' यांनी या परिषदेचे संयोजन केले. राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, शेतीमालाचा आणि विशेषतः नाशवंत अशा मालाच्या वाहतुकीच्या अद्ययावत सुविधांमुळे हाती आलेले उत्पादन वाया जाण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
भारतातील शेती वैविध्यपूर्ण अशी आहे. त्यामुळे उत्पादनातही वैविध्य आहे. त्यामुळे नाशवंत अशा शेतीमालाच्या शेतकरी ते ग्राहक यादरम्यान च्या वाहतुकीबाबत सर्वंकष अशी प्रणाली तयार करावी लागेल. त्यासाठी धोरण आखावे लागेल. त्यामध्ये शेतकऱ्यांसह विविध घटकांशी विचारविनिमय करावा लागेल. शेतमालाची प्रभावी वाहतूकप्रणाली शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करू शकते. त्यातून त्यांच्या जीवनात बदल घडवता येईल. त्यांचे जीवनमान उंचावता येईल. हेही एक राष्ट्रबांधणीचे कार्य आहे असे समजून व्यापार व उद्योग क्षेत्राने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
सुरुवातीला राज्यपाल श्री. कोश्यारी तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 'असोचॅम' चे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी स्वागत केले. ‘टीसीआय’चे उपाध्यक्ष अमिताभ मुखर्जी यांनी परिषदेची संकल्पना विषद केली. बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या एग्रिक्लचर अँड फूड प्रोसेसिंग समितीवरील तज्ज्ञ सदस्य डॉ. एस. के. गोयल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांची भाषणे झाली. ‘असोचॅम’चे सरचिटणीस दिपक सूद यांनी आभार मानले.
अन्न, फळे, भाजीपाला, औषधे यांसह नाशवंत तसेच अन्य जीवनावश्यक घटकांच्या वाहतुकीतही कोल्ड स्टोअरेजसारख्या सुविधा आवश्यक असतात. अशा घटकांच्या साठवणूक, वाहतूक, नियमन आणि व्यवस्थापन यादृष्टीने तसेच या क्षेत्रातील गुंतवणूक संधी यासंदर्भात या परिषदेत तज्ञांनी मांडणी केली.
Share your comments