नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. आधीच टोमॅटोला भाव मिळत नाही आहे, त्यातच आता टोमॅटोवरील प्लास्टिक व्हायरस हे शेतकऱ्यासमोर मोठ संकट उभं राहील आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं पिकं सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
नाशिक जिल्ह्यात कांदा आणि टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हळूहळू टोमॅटो पीक बाजारात येऊ लागले आहे. टोमॅटो पीक ऐन भरात असताना प्लास्टिक व्हायरसचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दुष्काळी परिस्थितीत पाणी, औषधं फवारणी खतांची जमवाजमव करुन पीक वाढविले, मात्र 50 व्या दिवसापासूनच टोमॅटो पिवळा पडायला लागला आहे, टोमॅटो दाबला तरी तो दाबला जात नाही, एवढा कडक असून खेळण्यातील प्लस्टिकच्या टोमॅटोसारखा चमकत असल्याने शेतकऱ्यांनी त्याला प्लॅस्टिक व्हायरस नाव दिले आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सर्वच भागात टोमॅटोची शेती केली जाते. टोमॅटो झाडांवरच पिवळा पडत असल्याने सगळं पीक शेतकऱ्यांनी सोडून दिले. टोमॅटो पिक खराब झाले असून अशा पिकांची विक्री होणार नसल्याने शेतकऱ्यांनी आशा सोडून दिली आहे. वातावरणातील बदलामुळे आणि भेसळयुक्त बियाणे मिळाल्याने पीक खराब झाल्याचा दावा शेतकरी करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील वडाळी आणि आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या टोमॅटोवर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत आहे.दरम्यान शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या पथकाने पिकांची पाहणी करुन त्याचे पंचनामे केले आहेत. 50/60 दिवस वाढलेली पीक खराब का होत आहेत, याची कारणे शोधली जात आहेत. तसेच बियाणे खराब, भेसळयुक्त असतील तर संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांन समोरील संकट थांबण्याच नाव घेत नाही. 13 दिवसानंतर कांद्याचे लिलाव सुरू झल्यानं कांद्या उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असताना आता टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
Share your comments