हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांचा जन्मदिन (१ जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते.‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये सांगितले होते. वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. 'शेती आणि शेतकरी' हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात 'कृषी विद्यापीठां'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. १९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला.
राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. 'रोजगार हमी योजने'तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. कृषीक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण 'कृषी दिन' म्हणून साजरा करतो. दरम्यान आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कृषी दिन साजरा करण्याबाबत सांगितले आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले होते की, एक तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. तसेच वसंतराव नाईक यांची जयंती देखील आहे. हा आठवडा शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करू. शेतकरी आणि डॉक्टरांसाठी हा दिवस साजरा करुन त्यांना सलाम करुयात, असे ठाकरे यांनी म्हटले होते.
Share your comments