देशात कापूस उत्पादनात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यांचा मोठा वाटा आहे. देशातील महत्त्वाची कापूस उत्पादक महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि मध्य प्रदेश ही राज्ये शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या विचारात आहेत. शेतकऱ्यांना हमीभावावर प्रतिक्विंटल 500 रुपये बोनस देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरवातीला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती या निर्णय प्रक्रियेतील वर्तुळात सहभागी असलेल्या सूत्रांनी दिली.
जागतिक बाजारपेठेत कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांचा कापूस बोंडअळीग्रस्त आहे असे बहाणे करून शेतकऱ्यांकडून कापूस कवडीमोल भावात खरेदी केला जात आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कापसाला सरासरी साडेतीन ते चार हजारपर्यंत दर मिळत आहे. सरकारी खरेदी केंद्र नावालाच असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव गावात येणाऱ्या व्यापाऱ्यांना आपला कापूस विकावा लागत आहे.
केंद्र सरकारने यंदा कापसाच्या हमीभावात 1 हजार 130 रुपयांची वाढ केली आहे. मध्यम लांब धाग्याच्या कापसाला 5,150 रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर करण्यात आला आहे. तर लांब धाग्यासाठी 5,450 रुपये हमीभाव आहे. 500 रुपये बोनस धरल्यास या राज्यांतील शेतकऱ्यांना अनुक्रमे 5,650 रुपये आणि 5,950 रुपये प्रतिक्विंटल दर मिळेल.
Share your comments