कुकडी डावा कालव्याचे रब्बीचे आवर्तन १५ डिसेंबरपासून सोडण्यात येणार असून आगामी काळात किती पाऊस पडतो, याआधारे या वेळापत्रकात कमीअधीक बदल करावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी संयुक्त प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत निश्चित करण्यात आले.
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार रोहित पवार, संजय शिंदे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (दूरदृष्यप्रणालीद्वारे), पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, जुलै २०२४ पर्यंत धरणाचे पाणी प्राधान्याने पिण्यासाठी राखून ठेवावे. त्याप्रमाणे पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. उर्वरित पाणी रब्बी पिकांना देण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच टँकरसाठी पाणी स्रोत आदींचे नियोजन करावे लागेल, असेही पवार म्हणाले.
हवामान विभागाने दोन चक्रीवादळे तयार होत असल्याचा अंदाज व्यक्त केला असून त्यामुळे पाऊस पडू शकतो असे सांगितले आहे. त्यानुसार पुढील काळात किती पाऊस पडतो हे पाहून सिंचन व पिण्यासाठी पाणी सोडण्याच्या तारखात लवचिकता ठेवावी लागेल, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
कालव्यांच्या अस्तरीकरणाची कामे तातडीने करुन घ्या. त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. पाणीपट्टी वसूल करुन त्यातील ठरावीक रक्कमेतून पोटचाऱ्या दुरुस्ती करुन घ्याव्यात, पाणीवापर संस्थांनाही फाटे, चाऱ्या स्वच्छ करण्यास सांगावे. चार तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी सोडण्याबाबत नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, असेही निर्देश पवार यांनी दिले.
या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगांना पाणी दिले जाते. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. सर्व भागात, पोटचाऱ्यांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगतले.
घोड प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे घोड उजवा व डावा कालव्यातून रब्बीची दोन आवर्तने आणि उन्हाळी एक आवर्तनाचे नियोजन असून पहिले आवर्तन 25 डिसेंबरच्या आसपास सोडण्यात येईल, असे यावेळी निश्चित करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कमी पावसामुळे जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या निरीक्षण विहीरींमध्ये पाणीपातळी गेल्या पाच वर्षाच्या सरासरीपेक्षा सुमारे सव्वा मीटरने खाली गेल्याचे सांगितले.
यावेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत सहकारमंत्री वळसे पाटील यांनी तसेच उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या. बैठकीच्या सुरवातीला कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी कुकडी प्रकल्पात सध्या 90 टक्के पाणीसाठा असल्याचे सांगितले तसेच प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व नियोजनाबाबत सादरीकरण केले.
Share your comments