Cotton Crop Update :- महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सर्वाधिक लाभले जाणारे पीक म्हणजे कापूस आणि सोयाबीन हे होय. मागच्या वर्षी या दोन्ही महत्त्वाच्या पिकांच्या बाजारभावाने शेतकऱ्यांची निराशा केली. दहा हजार रुपये प्रतिक्विंटल कापसाच्या दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बरेच दिवसांपर्यंत कापूस घरात साठवला. परंतु तरी देखील कापसाला योग्य तो बाजार भाव मिळाला नाही. तीच गत सोयाबीनची देखील झाली. या सगळ्या परिस्थितीचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला.
परंतु या हंगामात कापूस पिकाचा विचार केला तर अपेक्षित बाजारभाव शेतकऱ्यांना मिळणे खूप गरजेचे आहे. कारण कापसाचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आणि त्यातच बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे उत्पादनात देखील प्रचंड घट येते. परंतु या हंगामाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील कापूस उत्पादनाची स्थिती आणि जागतिक स्तरावरील मागणी या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर या हंगामात कापूस भाव चांगले राहतील अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हे तीन कारणे ठरतील कापूस पिकासाठी महत्त्वाचे
1- अमेरिकेच्या कापूस उत्पादनात येणार घट- आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विचार केला तर अमेरिकेतील कापूस उत्पादनामध्ये चार टक्क्यांची घट येण्याचा अंदाज असून मुख्य कापूस उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमध्ये देखील पाच टक्क्यांनी उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. भारतात देखील दोन टक्क्यांपर्यंत उत्पादन घटेल असे युएसडीएने म्हटले आहे.
जर आपल्या भारताचा विचार केला तर संपूर्ण भारतात ऑगस्ट महिन्यामध्ये सगळीकडेच पावसाचा मोठा खंड पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन टक्के पेक्षा जास्त कापूस उत्पादनामध्ये घट येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ही स्थिती कापूस बाजारासाठी महत्त्वाची ठरू शकते.
2- चीनची कापूस उत्पादनाची स्थिती- अमेरिकेच्या कृषी विभागाने जागतिक कापूस उत्पादनाचा अंदाज वर्तवताना म्हटल आहे की या हंगामामध्ये जागतिक स्तरावरील कापसाचे उत्पादन 6% ने कमी राहील. परंतु दुसरीकडे मात्र कापूस वापर वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. याचा विचार केला तर चीन हा देश कापूस उत्पादनाच्या आणि वापराच्या बाबतीत अव्वल स्थानावर असून मात्र चीनमधील कापसाचे उत्पादन या हंगामात 12 टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. त्याच्या उलट यावर्षी चीनला कापूस जास्त लागणार आहे.
त्यामुळे चीन कापसाची गरज भागवण्यासाठी इतर देशांकडून खरेदी करण्याची शक्यता आहे. जर चीन कापूस खरेदीत उतरला तर कापसाचा बाजार वाढतो हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ही परिस्थिती देखील कापूस बाजार भावाला पोषक ठरू शकते.
3- भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमधील स्थिती- भारताचा विचार केला तर 122 लाख हेक्टर कापसाची लागवड झाली. परंतु प्रमुख कापूस उत्पादक राज्य जसे की गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये 77% क्षेत्र कापूस लागवडीखाली आहे. परंतु या राज्यांमध्ये पावसाने मोठा खंड दिलेला आहे व याचा विपरीत परिणाम कापूस उत्पादनावर होण्याचा संभव आहे. देशांतर्गत कापसाचे उत्पादन देखील घटण्याचा अंदाज असल्यामुळे देशांतर्गत बाजारात देखील कापसाचे भाव चढेच राहू शकतात.
Share your comments